उल्हासनगर : सत्तेतील सहभागासाठी शिवसेनेसोबत वाटाघाटी सुरू असून आठवडाभरात अंतिम निर्णय होईल, असे सांगत भाजपाचे जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी गुरूवारी युती होणार असल्याचे मान्य केले. शिवसेनेच्या नेत्यांनीही भाजपासोबत बोलणी सुरू असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.उल्हासनगरात सत्तापालट होणार असल्याच्या आशयाचे वृत्त गुरूवारी लोकमतने प्रसिद्ध करताच राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. सवार्धिक गोंधळ उडाला तो ओमी कलानी यांच्या टीममध्ये. त्यांच्या राजकारणाचा पायाच या वृत्तामुळे डळमळीत झाला. त्यामुळे सत्तेत असताना भांड्याला भांडे लागायचेच असे सांगत त्यांनी सावध पवित्रा घेतला. साई पक्षातही या वृत्तामुळे एकदम सन्नाटा पसरला. यापुढे आपल्या दबावाच्या राजकारणाला खीळ बसल्याची जाणीव त्यांना झाली. शिवसेनेसोबत असलेल्या छोट्या पक्षांच्या आकाक्षांना मात्र या बातमीनंतर पालवी फुटली असून आपल्यालाही सत्तेचे लाभ मिळतील, अशी आशा त्यांना वाटू लागली आहे.उल्हासनगर महापालिकेवर सध्या जरी भाजपा, ओमी टीम आणि साई पक्षाची सत्ता असली, तरी भाजपातील एक गट आणि ओमी टीममधून विस्तव जात नव्हता. त्याचा फायदा साई पक्षाने उठवला. त्यातून ओमी टीमला सत्तेतील वाट्यापासून बाजूला ठेवल्याने असंतोष वाढत गेला. त्यातच विधानसबा निवडणूक लढवण्याचे कलानी कुटुंबाने जाहीर केल्याने आयलानी विरूद्ध कलानी शक्तिप्रदर्शनाला सुरूवात झाली. त्यामुळे भाजपा आणि ओमी कलानी एकत्र नांदणार नाहीत, हे स्पष्ट झाले. त्यातच पोटनिवडणूक हरल्याने, महासभेत पाणीप्रश्नी मांडलेल्या लक्षवेधीतून ही दरी वाढत गेली.भावी महापौर मानल्या जाणाऱ्या पंचम ओमी कलानी यांची लक्षवेधी विद्यमान महापौर मीना कुमार आयलानी यांनी फेटाळल्याने भाजपा, ओमी टीमच्या नगरसेवकांत सोशल मीडियावर बाचाबाची सुरू झाली. त्यात आमदार ज्योती कलानी यांनीही उडी घेतल्याने भाजपा-ओमी कलानी यांच्यात बिनसले. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेत भाजपाने या संकटातून आपली सुटका करून घेण्याची पावले उचलली आहेत. वाटाघाटी अंतिम होताच उल्हासनगरात सत्तापालट होईल.आठवडाभरात निर्णय - आयलानीभाजपा आणि ओमी टीममध्ये धुसफुस सुरू असून पंचम कलानी यांच्या लक्षवेधीमुळे दोन्ही पक्षाचे वाद चव्हाटयावर येताच त्याची माहिती शहर कमिटीने वरिष्ठ नेत्यांना दिली. आठवडाभरात त्यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे कुमार आयलानी यांनी स्पष्ट केले.‘भाजपा-ओमी टीम एकत्र राहतील’एका घरात संसार करताना भांड्याला भांडे लागणारच. मात्र त्यांचा अर्थ असा होत नाही, भाजपासोबतची आमची सत्ता जाईल. भाजपा आणि ओमी टीम सत्तेची पाच वर्षे पूर्ण करतील. यातून नक्की काहीतरी मार्ग निघेल, असा विश्वास ओमी टीमचे वरिष्ठ नगरसेवक राजेश वधारिया यांनी व्यक्त केला.हो, चर्चा सुरू आहे!भाजपाच्या वरिष्ठ आणि स्थानिक नेत्यांनी महापालिकेतील सत्तेसाठी शिवसेनेकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे. त्याची कुणकुण आम्हाला लागली आहे. चर्चा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आणि विरोधी पक्षनेता धनंजय बोडारे यांनी दिली.भाजपातून ओमी गट फुटण्याची चिन्हेमहापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ओमी कलानी यांनी प्रत्येक प्रभागनिहाय टीमची बांधणी केली आणि कामांना सुरूवात केली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडू नये, असे प्रयत्न त्या पक्षाच्या नेत्यांनी केले. त्यानंतरही ओमी यांनी पक्षांतर केले. ते भाजपात आले, पण भाजपाच्या चिन्हावर लढण्याचा त्यांचा निर्णय चुकला.त्या निर्णयाने त्यांची वाटाघाटींची क्षमताच संपली. भाजपातील त्यांचे विरोेधक आणि साई पक्षाने त्यांचे राजकीय महत्त्वच संपवून टाकले. सध्या ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या आमदार असल्या, तरी त्यांच्याऐवजी ओमी यांनी विधानसभेवर जावे, असे कुटुंबाचे प्रयत्न सुरू आहेत.त्यामुळे भाजपातील आपल्या नगरसेवकांसह फुटून बाहेर पडण्याचा पर्याय त्यांच्यापुढे आहे. त्यानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीत जातील आणि तेथून विधानसभेची उमेदवारी मिळवतील, असाअंदाज व्यक्त केला जात आहे.
उल्हासनगरच्या सत्तावाटपासाठी भाजपाची शिवसेना नेत्यांशी बोलणी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:26 AM