मुरबाड : केंद्र शासनाने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धोक्याचा इशारा दिल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी विभागांतर्गत सर्व कर्मचाऱ्यांना योग्य ती उपाययोजना करण्यासाठी जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मागच्या कोरोनाच्या दोन लाटांप्रमाणेच तिसऱ्या लाटेला परतवून लावले जाईल, असे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारती गोटे यांनी सांगितले.
मुरबाड पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर बनसोडे यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या या पदावर तुळई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. भारती गोटे यांच्याकडे प्रभारीपद आलेले असतानाच केंद्र सरकारने कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्यालगत असलेल्या कल्याण - बदलापूर, शहापूर या ठिकाणी कोरोनाने अनेकांचे बळी घेतले. मात्र, येथील आरोग्य यंत्रणा सतर्क राहिल्याने कोरोनाच्या दोन लाटा येऊनही मुरबाड तालुक्यात त्याचा प्रभाव दिसला नाही. मात्र, तिसरी लाट भयावह असल्याचा इशारा मिळाल्याने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारती गोटे यांनी आरोग्य विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्यात पावसाची उघडझाप सुरू झाल्याने हवामानात बदल झाला आहे. त्यामुळे खोकला, थंडी व तापाने नागरिक फणफणले आहेत. मुरबाड तालुक्यात खोकला, थंडी, तापाने हातपाय पसरले असून, यासाठी सर्व ग्रामसेवकांना गावात फवारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे पंचायत समितीचे सभापती दीपक पवार यांनी सांगितले.
‘सॅनिटायझरचा वापर करा’
गावोगावी डासांची पैदास वाढली आहे. डेंग्यू, मलेरियाचा फैलाव होण्याची शक्यता गृहीत धरून ग्रामपंचायतींनी घरोघरी औषध फवारणी करावी, यासाठी गटविकास अधिकारी व तहसीलदार यांच्यासोबत बैठक घेतली जाणार आहे. तसेच, आरोग्य विभागाकडून अँटिजन चाचण्या केल्या जाणार आहेत. मात्र, प्रशासन सर्व प्रयत्न करीत असले तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भारती गोटे यांनी सांगितले.