लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- तामिळनाडू राज्यातील तिरची गॅंगच्या आरोपीला अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून तो वाहनांची काच फोडून चोरी करायचा. आरोपीकडून पोलिसांनी सहा गुन्ह्यांची उकल केल्याची माहिती नालासोपाऱ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांनी गुरुवारी दिली आहे.
वसईच्या अंबाडी रोडवरील लाभ कॉंप्लेक्समध्ये राहणारे व्यापारी अमित गडकरी (५५) हे १९ ऑक्टोबरला दुपारी टाटा सफारी गाडीने वैयक्तिक कामासाठी नालासोपारा पश्चिमेकडील कोटक बँकेत आले होते. ते त्यांच्या गाडीच्या मागील सीटवर २ लॅपटॉप व २७ हजार रुपयांची रोख रक्कम सॅकमध्ये ठेवून वाहनाला लॉक करून गाडी रस्त्याच्या कडेला उभी करून बँकेत आले. काम संपून वाहनाजवळ आल्यावर मागील काच फुटलेली व सॅक सीटवर नव्हती. गाडीतून सॅक चोरी झाल्याने त्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला होता. नालासोपारा पोलीस ठाण्याच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास सुरु केला.
आरोपींचा शोध घेताना नालासोपारा, वसई, बोरीवली व मुंबई परिसरातील सुमारे २५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. घटनास्थळावरील पुरावे व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत आरोपी शनमुगम अमरनाथन (३८) याला निष्पन्न करून त्याला त्याच्या राहत्या घरातून ९ सप्टेंबरला अटक करण्यात आली. अटक आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याच्याकडून २० हजारांचा एच पी कंपनीचा १ लॅपटॉप आणि २७ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे साथीदारांसोबत मिळून मुंबई, नवी मुंबई परिसरात ठिकठिकाणी चोरी केलेल्या आहेत. आरोपीकडून नालासोपारा पोलिसांनी ६ गुन्ह्यांची उकल केली आहे. तर आरोपीवर परराज्यात १३ गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय , अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त जयंत बजबळे, सहा. पो.आयुक्त विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) धनंजय शिंदे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र चंदनकर, पोउपनि योगेश मोरे, सफौ हिरालाल निकुंभ, पोहवा प्रशांत साळुंके, अमोल तटकरे, कल्याण बाचकर, राजेश नाटूलकर, प्रेम घोडेराव, सोहेल शेख यांनी केली आहे.