ठाणे : ठाणेकरांवर काळजी करण्याची वेळ आता आली आहे, त्याचे कारणही तसेच आहे. मागील काही दिवसांत ठाण्यात कोरोनाचा उद्रेक झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असून, ही संपूर्ण यंत्रणाच आता ऑक्सिजनवर आली आहे. एकीकडे कोविड सेंटरमध्ये पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होण्यास विलंब होत आहे, तर दुसरीकडे बाधितांच्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. परंतु, मृतांच्या आकड्यावरूनदेखील संभ्रम निर्माण झाला आहे. त्यात पीपीई किटच्या कमतरेमुळे महापालिकेवर चक्क मृतदेह कचऱ्याच्या पिशवीत बांधण्याची वेळ आली आहे, तर शववाहिनीवर कोविड स्मशानभूमीत काम करणाऱ्यांकडेदेखील पीपीई किट नाहीत. आजही शहरासाठी आवश्यक असलेला रेमडेसिविरचा पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नाही.
ठाणे शहरात मार्चपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत रोजच्या रोज पाच पटीने वाढ झाल्याचे दिसत आहे. एप्रिल महिन्यात तर रोजच्या रोज पंधराशे ते अठराशे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या ग्लोबल आणि पार्किंग प्लाझा येथील कोविड सेंटरवरील ताण वाढला असून, येथे बेड मिळणेदेखील मुश्कील झाले आहे. त्यात आता या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना आणि खासगी रुग्णालयांनादेखील ऑक्सिजनची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही तर महापालिकेची यंत्रणा व्हेंटिलेटरवर आल्याशिवाय राहणार नाही. ठाणे महापालिकेला आता १५० मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे. परंतु, मागणीप्रमाणे १५ ते २० टक्के पुरवठा कमी होत आहे. त्यातही मागील १० ते १२ दिवसांत ऑक्सिजनचा वापर दुपटीने वाढला आहे. त्यामुळेच आता शहरात ऑक्सिजनचा तुटवडा झाला आहे. एकीकडे रेमडेसिविरचा तुटवडा असताना दुसरीकडे महापालिकेच्याच कोविड सेंटरमधून रेमडेसिविरचा काळा बाजार होत असल्याची बाब समोर आली असून, त्याचा तपास आता पोलीस करीत आहेत. त्यातही महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये सध्या अपुरा रेमडेसिविरचा साठा असल्याने त्यांनी खासगी रुग्णालयांना आपल्याकडील साठा देण्यास हात आखडता घेतला आहे.
आता मागील काही दिवसांत बाधित रुग्णांबरोबरच मृतांचा आकडादेखील वाढू लागला आहे. एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाइकांना तासन्तास ताटकळत स्मशानभूमीत राहावे लागत आहे. सोमवारीदेखील ग्लोबल रुग्णालयात १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातही मृतदेह चक्क कचऱ्याच्या पिशवीत बांधण्याची धक्कादायक घटनादेखील समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेकडे आता पीपीई किटचीदेखील कमतरता असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे आता महापालिका मृतांचा आकडा लपवित असल्याचे दिसत आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून जाहीर होणाऱ्या आकडेवारीत आणि महापालिका जाहीर करीत असलेल्या आकडेवारीतदेखील तफावत आढळली आहे. त्यातही हे मृतदेह स्मशानभूमीपर्यत नेणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे पीपीई किट नसल्याचे दिसून आले आहे. तसेच कोविड स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेदेखील पीपीई किटची वानवा आहे. त्यामुळे आपल्या जिवाची पर्वा न करता हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जीवही यामुळे टांगणीला लागला आहे. एकूणच आता शहराची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली असून, महापालिका प्रशासनावरदेखील यामुळे ताण वाढू लागला आहे. त्यामुळेच आता सध्याची परिस्थिती पाहिली तर महापालिकेची आरोग्य यंत्रणाच ऑक्सिजनवर आल्याचे दिसत आहे.