भार्इंदर - मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील वरसावे वाहतूक बेटाजवळ एलपीजी गॅसने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी 12.20 वाजताच्या सुमारास पलटला. टँकरमधील गॅस गळती होऊ लागल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक खंडित करण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी सांगितले.एलपीजी गॅसने भरलेला टँकर मुंबई-अहमदाबाद मार्गावर पलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. या अपघातात सुदैवाने त्याच्या आसपास कोणतीही वाहने तसेच माणसे नसल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु टँकरमधील गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच तेथील वाहतूक कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दीड तास वाहतूक रोखून धरली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमनचे अधिकारी, उपायुक्त व जवानांसह फायर व वॉटर गाड्या काही वेळेतच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी परिसरात मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई करून टँकर व गळती झालेल्या गॅसवर पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली.
उपायुक्तांनी घटनेची माहिती भारत पेट्रोलियम कंपनीला दिल्यानंतर कंपनीने एका रिकाम्या टँकरसह विशेष पथक घटनास्थळी रवाना केले. दीड तासानंतर नवीन वरसावे खाडी पुलावरुन प्रत्येकी १० मिनिटांच्या अंतराने दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू केली. दरम्यान या दुर्घटनेमुळे घोडबंदर मार्गासह, वसई-विरार व मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील महामार्ग क्र. ८ वर प्रचंड वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. अतिरीक्त पोलिस अधिक्षक प्रशांत कदम यांनी स्वत: उपस्थित राहून तेथील घटनेवर नियंत्रण ठेवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे उपायुक्तांनी सांगितले.वरसावे पुलावरच्या वाहतुकीच्या मार्गात केला बदलठाणे ग्रामीण पोलिसांनी वाहन चालकांना वरसोवा मार्गे न जाण्याचा आवाहन केलं आहे. तसेच मुंबईहून गुजरातला जाणा-या मार्गांतही बदल करण्यात आले आहेत. मुंबईकडून काशिमीरा मार्गे गुजरातकडे जाणारे वाहन नाशिक रोडहून भिवंडी मार्गे गुजरात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणेच ठाणे घोडबंदरकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहन नाशिक हायवे-भिवंडीमार्गे गुजरातला जाण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ठाण्याहून घोडबंदर मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनाही मुलुंड - घाटकोपर मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी वाहन चालकांना हे आवाहन केलं आहे.