- पंकज राऊत, बोईसर
तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील कारखान्यांतून उत्पादन प्रक्रीयेनंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचे प्रमाण चाळीस ट्क्क्यांनी कमी करण्याचे आदेश राष्ट्रीय हरीत लवादाने दिल्यानंतर एमआयडीसीने सोमवार (दि. २४) पासून पाणी पुरवठ्यामध्ये चाळीस टक्के कपात सुरु केल्याने त्याचा गंभीर परिणाम नागरी वस्त्यांबरोबरच तारापूरच्या सुमारे सहाशे लघुउद्योगांवर होणार असून अशीच परिस्थिती कायम राहिल्यास लघुउद्योग बंद होण्याची भीती वर्तविण्यात येत असून हजारो कामगारांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे.पर्यावरणाचे कधीही भरून न येणारे नुकसान होत असल्याने राष्ट्रीय हरीत लवादा निर्णय योग्य होता व त्याची गरजही होती परंतु ज्या मोठ्या उद्योगांनी झिरो डिस्जार्ज (सांडपाणी मुक्त)च्या नावाखाली महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कंन्सेंट मिळवून उद्योग उभारले तर काहींनी उद्योगांचे विस्तारीकरण केले आणि त्याच काही मोजक्या उद्योगांनी झिरो डिस्जार्ज संदर्भातील यंत्रणा दिखाव्या पुरता उभारून सर्व नियम धाब्यावर बसवून एमआयडीसीमधील सांडपाण्याच्या वाढीमध्ये प्रचंड भर घातली. ते उद्योग आज नामनिराळे असून त्यांच्याकडे मोठ्या व्यासाच्या पाणी पुरवठ्याच्या लाईन असल्याने त्या उद्योगांना पाणी कपातीचा फारसा फरक पडला नसून खरा फरक सहाशे लघुउद्योगांना तसेच नागरीवस्त्यांना पडला असून चोर सोडून सन्यासाला फाशी अशी अवस्था लघुउद्योगांची झाली आहे तर कुपनलिकेचे आणि विहिरींचे प्रदूषीत झालेल्या पाण्यामुळे कुपनलिकेचे आणि विहिरींचे प्रदूषीत झालेल्या पाण्यामुळे औद्योगिक क्षेत्र परीसरातील नागरीकांना एमआयडीसीच्या पाण्याशिवाय पर्याय नसल्याने पाणी कपाती अभावी त्या लाखो नागरीकांची अवस्था दयनिय झाली आहे.चाळीस टक्के पाणी कपातीमुळे ज्या लघुउद्योजकांकडे अर्धा, पाऊण व दीड ते दोन इंच व्यासाची पाण्याची लाईन आहे. त्या बहुतांश उद्योगांसमोर पाण्याची गंभीर समस्या उभी ठाकली असून पाण्याअभावी उद्योग बंद करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचे मुख्य कारण मोठ्या प्रमाणात लघुउद्योगांतून तयार होणारे उत्पादन हे निर्यात होते. एकदा उत्पादनात खंड पडला तर एकदा त्याचे ग्राहक दुरावले तर पुन्हा मिळविणे कठीण असते म्हणून काही लघुउद्योग तर कायम स्वरुपी बंद पडण्याची शक्यता तारापूरच्या लघु उद्योजकांतर्फे वर्तविण्यात येत आहे.तारापूरला टेक्सटाइल, केमिकल्स, इंजिनियरींग, फार्मासिटीकल्य, इ लघुउद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात असून असे किमान सहाशे लघुउद्योग सध्या कार्यरत आहेत. त्यामध्ये हजारो कामगार काम करीत आहेत, या गंभीर पाणी संकटातून मार्ग काढण्याकरीता तारापूर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर असोसिएशन (टीमा) या उद्योजकांच्या संघटनांनी टीमाचे अध्यक्ष डी. के. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी दुपारी टीमा हॉलमध्ये लघुउद्योजकांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये टीमाच्या सिनियर मेंबरची एक विजीलन्स टीम तयार करून ती टीम ज्या उद्योगांचे झीरो डिस्चार्जची अमलबजावणी करण्यास विनंती करण्यात येणार असून विनंती केल्या नंतरही अंमलबजावणी न केल्यास एमपीसीबीच्या माध्यमातून नियंत्रण आणण्याचे एकमताने ठरले असून ज्यांचे उद्योगामधून जास्त प्रमाणात सांडपाणी बाहेर पडते त्यांनी आठवड्यातून एक दिवस उद्योग बंद ठेवावा असे पाच-पाच उद्योग आळीपाळीने बंद ठेवल्यास सांडपाण्यावर निश्चितच नियंत्रण येऊन लघुउद्योगांना जीवदान मिळणार आहे, असे टीमातर्फे सांगण्यात आले.तारापूर औद्योगिक क्षेत्रतारापूर औद्योगिक क्षेत्रामधील सामुदायिक सांडपाणी प्रक्रीया केंद्राच्या पंचवीस एमएनडी क्षमतेपेक्षा अतिरिक्त येणाऱ्या पंधरा ते वीस एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रीया न करताच ते सांडपाणी सरळ शेती, बागायती, नाल्यात व नवापूरच्या समुद्रात सोडत असल्याने त्याचा गंभीर परिणाम मांगेला समाजाने राष्ट्रीय हरीत लवादाचे दरवाजे ठोठावल्यानंतर लवादाच्या आदेशानंतर चाळीस टक्के पाणी कपात सुरु करण्यात आली आहे.राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाचा आम्ही पूर्ण आदर राखतो. परंतु एमआयडीसी ने अतिरेक करू नये, ज्यामुळे लघुउद्योग कायमचे बंद पडतील तसेच नवीन सीईटीपी लवकरात-लवकर सुरु होण्याकरीता निधीची गरज आहे. ती सबसीडीच्या रुपात सरकारने निधी द्यावा लघूउद्योग बंद झाल्यास पर्यायाने कामगारांचेही नुकसान होणार असून सरकारच्या महसूलातही घट होणार आहे, त्यामुळे त्वरीत योग्य मार्ग काढणे गरजेचे आहे. - डी.के. राऊत, अध्यक्ष टीमा