किन्हवली : श्री क्षेत्र टाकेश्वर मठाचे मठाधिपती योगी फुलनाथ बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर तालुक्यातील प्रगतशील शेतकऱ्यांची सहल काढण्यात आली होती. शहापूर तालुक्यातील आदर्श शेतकरी स्वामी विशे यांच्या प्रेरणेने येत्या पावसाळ्यात दहा टन सुरण लागवडीचे लक्ष्य या शेतकऱ्यांच्या समूहाने ठेवले आहे. यासाठी कृषिभूषण विवेक कोरे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.
तालुक्यातील परंपरागत शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सुधारणा करण्याचे ध्येय या शेतकऱ्यांनी ठेवले आहे. बारमाही शेतीसाठी पावसाचे पाणी अडविणे, त्यादृष्टीने वनराई बंधारे तसेच सिमेंट काँक्रिटचे बंधारे बांधणे तसेच नदी गाळ मुक्ती मोहिमेद्वारे योगी फुलनाथ बाबांनी सशक्त शेतकरी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. शेतकरी समूहांच्या सहलीतून आणि प्रत्यक्ष प्रगत शेती दर्शनातून कृषीविषयक जागृतीचे काम केले. या वर्षी शेतकरी मेळावा घेऊन शहापूर तालुक्यातील कंदमुळे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देऊन कंदमुळे लागवडीतून आर्थिक प्रगती साधण्याचा मंत्रच योगी फुलनाथ बाबा यांनी दिला आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती पद्धत बदलून आधुनिक शेती करून आर्थिक सक्षम होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.
- योगी फुलनाथ महाराज,
मठाधिपती, श्री क्षेत्र टाकेश्वर