कल्याण - शहराच्या पश्चिम भागातील आर्चिच गॅलरीजवळ चोरटय़ांनी पत्रकार संदेश शिर्के यांना गाडी समोर काही तरी पडले असल्याचा बनाव करुन त्यांना बोलण्यात गंगवून त्यांच्या गाडीतील एक लाख रुपये व कॅमेरा असा 1 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिर्के यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस त्याचा तपास करीत आहेत. शिर्के हे बातमीदार डॉटकॉम नावाचे स्थानीक चॅनल चालवितात. तसेच ते साम टिव्ही व टाईम्स नाऊसाठी बातम्या देतात. काल ते एअरटेल गॅलरीत पैसे भरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी गॅलरी बंद असल्याने ते पुढच्या गॅलरीत गेले. त्याठिकाणाहून परत येत असताना रस्त्यावर फेरीवाल्यांकरीता जे पट्टे मारले आहे. हे पाहून ते फेरीवाल्यांकडे विचारपूस करण्यासाठी गाडीतून उतरले. पुन्हा ते गाडीजवळ आले. त्यांनी गाडीचे दार उघडले. तेव्हा बाहेरून एका माणसाने त्यांच्या गाडीच्या दादावर जोराने टकटक केले. तेव्हा शिर्के यांनी काय झाले अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी गाडीसमोर काय पडले आहे ते पहा. तेव्हा शिर्के यांना वाटले की, गाडीला ज्ॉमर लावल्याचा संशय आला. ते खाली उतरले. इतक्यात चोरटय़ाने संधी साधून मागच्या डोरमधून मागच्या सिटवर असलेला शिर्के याचा व्हीडीओ कॅमेरा, दोन स्टिंग ऑपरेशनचे इम्पोर्टेड कॅमेरे आणि एक लाखाची रोकड असा एक लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. एका क्षणात हा प्रकार घडला. गाडीचा मागचा डोर उघडा असल्याने शिर्के यांची लूट झाल्याचे कळाले. त्यांनी तातडीने महात्मा फुले पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा तपास सुरु केला आहे. गुन्हे शाखेकडे हा तपास देण्यात आला आहे. हा प्रकार ज्याठिकाणी घडला. त्याठिकाणी असलेल्या दुकानदारांचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार आहे. कल्याण शहरात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला असून आत्ता त्यांनी चक्क पत्रकारांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा जलदगतीने तपास करावा अशी मागणी पत्रकारांनी केली आहे.
कल्याणमधील चोरटय़ांनी केले पत्रकाराला लक्ष्य, एक लाखाची रोकड व कॅमेरे लांबवले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2017 5:52 PM