लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर केला होता. दरम्यान, सध्या नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली आहे. ही कल्याण डोंबिवलीकरांसाठी आणि मनपा प्रशासनासाठी निश्चितच दिलासादायक बाब आहे. दरम्यान, घटलेली रुग्णसंख्या पाहता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी सुरू केलेली काही कोविड उपचार केंद्र उद्यापासून बंद करण्यात येणार आहे. काही खासगी रुग्णालयांनीही त्यांची रुग्णालये नॉन कोविड करून त्याठिकाणी लसीकरण केंद्रे सुरू केली आहेत.
केडीएमसीच्या हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण १४ मार्च २०२० रोजी सापडला. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून शनिवारपर्यंत १ लाख ३२ हजार ९४२ रुग्ण आढळले आहेत. २ हजार ५८७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १ लाख ३२ हजार ३२२ इतके रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ हजार ८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील बहुतांश रुग्ण होमक्वारंटाइन आहेत. जे वृद्ध आहेत तसेच त्यांना मधुमेह, रक्तदाबासारखे अन्य गंभीर आजार आहेत त्यांना मात्र रुग्णालयात उपचार केले जात आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर मांडला. यात सर्वाधिक नागरिक बाधित झालेच त्याचबरोबर मृत्यूचे तांडवही पाहयला मिळाले.
केडीएमसीच्या सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, पाटीदार भवन, जिमखाना, साई निर्वाणा, आर्ट गॅलरी, वसंत व्हॅली, टिटवाळा रुख्मिणी गार्डन प्लाझा आणि टाटा आमंत्रा अशा आठ केंद्रांसह ९०च्या आसपास खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार केले जात होते. दरम्यान, सद्य:स्थितीला मनपाच्या हद्दीत नव्याने आढळणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. ही समाधानाची बाब आहे त्याचबरोबर वैद्यकीय आरोग्य विभागावरील ताणही काहीसा कमी झाला आहे. रुग्णांची कमी झालेली संख्या पाहता मनपाकडून काही कोविड उपचार केंद्र उद्यापासून बंद करण्यात येणार आहेत. यात टाटा आमंत्रासह पाटीदार भवन, सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील टेनिस कोर्ट या केंद्रांचा समावेश आहे. टाटा आमंत्रा हे क्वारंटाइन आणि उपचार केंद्र होते. ते बंद करून लालचौकी येथील आर्ट गॅलरीमधील वरच्या मजल्यावर हलविण्यात येणार आहे. आर्ट गॅलरी येथील तळमजल्यावर सुरू असलेले उपचार केंद्र ५० टक्के क्षमतेने चालविणार जाणार असल्याची माहिती मनपाच्या साथरोग प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली.
-------------------------------------------
त्यांची सेवा मनपा रुग्णालयात
कोरोनाचा वाढलेला प्रादुर्भाव आणि अपुरे मनुष्यबळ यात केडीएमसीने कंत्राटी पद्धतीने डॉक्टर आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. परंतु सध्या रुग्णांची घटत असलेली संख्या पाहता काही कोविड केंद्र बंद केली जाणार आहेत. परंतु तेथील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र त्यांना काढले जाणार नसून मनपाच्या नागरी आरोग्य केंद्रात तसेच शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयात सेवेसाठी पाठविले जाणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.
---------------------------------------------
खानपान कंत्राट सुरूच राहणार
दुसऱ्या लाटेत अडीच हजारांहून अधिक दाखल असलेल्या रुग्णांची खानपानाची व्यवस्था केली जात होती. रुग्णसंख्या कमी झाली ही निश्चितच चांगली बाब आहे. परंतु आजही काही रुग्ण मनपाच्या कोविड उपचार केंद्रांमध्ये दाखल आहेत. रुग्णांना नाश्ता, दुपारचे जेवण, संध्याकाळी चहा आणि रात्रीचे जेवण तसेच लहान मुलांसाठी दूध दिले जात आहे. तसेच तेथील डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय व इतर कर्मचाऱ्यांनाही भोजन आणि नाश्ता दिला जात आहे. या खानपानाच्या सोयीसाठी कंत्राट देण्यात आले आहे. तीन ते चार कंत्राटदार नियुक्त केले असून, त्यांच्याकडे एक ते दोन केंद्रांची जबाबदारी देण्यात आली आहे. उद्यापासून काही कोविड केंद्र बंद करण्यात येणार आहे. परंतु जी केंद्र सुरू राहणार आहेत त्याठिकाणी खानपान सुरूच राहणार आहे, अशी माहिती या खानपान व्यवस्था सांभाळणारे मनपा सचिव संजय जाधव यांनी दिली.
------------------------------------------------------