भार्इंदर - काशिमिरा पोलिसांना गेल्या आठ वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांचे अर्धशतक पार करणाऱ्या तात्या पटेल उर्फ अश्रफ गुलाम रसुल पटेल याच्या मुसक्या आवळण्यात गुरुवारी यश मिळाले. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमिरा युनिटच्या पथकाने अंधेरीच्या वर्सोवा परिसरातून अटक केली.
काशिमिरा परिसरात पटेल कुटूंबातील अनेक सदस्यांवर विविध प्रकारचे शतकाहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांनी परिसरा दहशत निर्माण केली असुन त्यापैकी एक असलेल्या अश्रफ उर्फ तात्या याच्यावर हत्या करणे, हत्येचा प्रयत्न करणे, बोगस कागदपत्राद्वारे धमकी देऊन अनेकांच्या जमिनींवर जबरदस्ती कब्जा करणे, खंडणी उकळणे, बेकायदा शस्त्रे बाळगणे आदी अर्ध शतकाहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने गेल्या सप्टेंबर २०१७ मध्ये काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाटकेश परिसरात राहणाय््राा नझमा शकील अहमद पटेल या महिलेला जमिन बळकावण्याच्या वादातून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याच्यावर काशिमिरा पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापुर्वी त्याने आपल्या अंगरक्षकाची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर तो ४ वर्षे फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्यावर मकोका लावला होता. त्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी अनेकदा सापळे रचले. परंतु, तो पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार होत असे. तो गोरेगाव परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे सापळा लावताच तो एका अलिशान कारमध्ये फिरत असताना पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून मे २०११ मध्ये अटक केली होती. पोलिसांच्या हाती लागलेला तात्या गेल्याच वर्षी जामिनावर सुटला होता. त्यांनतरही त्याने आपली गुंडगिरी सुरुच ठेवल्याने पोलिसांनी पुन्हा त्याच्यावर मकोका लावला. त्याच्या शोधासाठी ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी शोधपथके तयार केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकट आंधळे यांना तात्या अंधेरी येथील वर्सोवा परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. आंधळे व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी त्याच्यावर पाळत ठेवली असता त्याला गुरुवारी जेरबंद करण्यात आले. महिलेच्या हत्येच्या प्रयत्नात आणखी दोन आरोपींचा समावेश असुन सध्या ते फरार आहेत. पोलिस त्यांच्याही शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.