सुरेश लोखंडे
ठाणे : मच्छीमारीसाठी ठाणे-पालघर जिल्ह्यातील बंदरांतून ८१७ बोटी गेल्या आहेत. शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत ६८९ बोटी बंदरात परत आलेल्या आहेत. मात्र, अद्याप १२९ बोटी अजून किनाऱ्याला लागलेल्या नसल्याने त्यांची प्रतीक्षा करण्यात येत आहे. अरबी समुद्रातील ‘तौत्के’ चक्रीवादळाच्या दृष्टीने समुद्रातील या बोटींबाबत चिंता वाढली आहे. यामध्ये ठाणे उत्तन बंदरातील ३१ बोटींसह पालघरच्या सातपाटी, डहाणू आणि वसई बंदरांतील ९७ बोटींचा समावेश आहे.
ठाण्याच्या उत्तन बंदरातून समुद्रात गेलेल्या ३०५ बोटींपैकी २२७ बोटी शनिवारी सकाळी व ४३ बोटी सायंकाळी तीन वाजेपर्यंत बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ३१ बोटी समुद्रात आहेत. याप्रमाणेच सातपाटी, एडवन, डहाणू, वसईच्या बंदरात ३३४ बोटी सकाळी बंदरात आल्या होत्या व त्यानंतर तीन वाजेपर्यंत ८५ बोटी बंदरात परतल्या आहेत. संध्याकाळपर्यंत या ४१५ बोटी बंदरात आल्या आहेत. मात्र, ८५ बोटी अजून समुद्रात असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या अहवालावरून उघड झाले आहे. अरबी समुद्रातील 'ताउते' चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी समुद्र किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवण्यात आली आहे.
१८ मेपर्यंत जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, तर चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे जाणार आहे. त्यापासून ठाणे, पालघर जिल्ह्यांना फारसा फटका बसणार नसला तरी सावधानता बाळगली जात आहे. समुद्रात गेलेल्या बोटींना किनाऱ्यावर लागण्यासाठी, बंदरात येण्यासाठी मच्छीमारांना आवाहन करण्यात येत आहे. सध्या मच्छीमारीसाठी उत्तन बंदरातून गेलेल्या ३०५ बोटींपैकी २८४ बोटी बंदरात आलेल्या आहेत. उर्वरित ३१ बोटींची वाट पाहिली जात आहे.
आपत्ती नियंत्रण व मदतकार्य कक्ष सतर्कठाणे जिल्ह्यातील समुद्र व खाडी किनारा, उत्तन बंदर विशेषतः पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये तौत्के या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील किनारपट्टीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यास अनुसरून जिल्हा प्रशासनास आपत्ती नियंत्रण व मदतकार्य कक्ष सतर्क आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातून पूर्वतयारी हाती घेतली आहे.