मीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे अचानक कोसळलेला मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी मीरा भाईंदर शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान केले आहे. महसूल विभागाने नुकसानीचे पंचनामे सुरू केले असले तरी शासकीय मदतीपेक्षा नुकसान मोठे आहे. मीरा भाईंदर महापालिका हद्दीत उत्तन, डोंगरी, तरोडी, पाली, चौक भागात शेतकऱ्यांनी बागायती, कांदा आणि भाजीपाला लागवड केली होती. तर घोडबंदर, चेणे आदी भागात सुद्धा आंब्याच्या बागा आहेत. चक्रीवादळाने बागायती आणि शेती पार उद्ध्वस्त करून टाकली आहे. या भागातील आंब्याला मागणी असली तरी आलेले पीक सुद्धा वादळाने हातचे गेले आहे.
आंबा, चिंच, जांभूळ, शेवगा आदी उत्पन्न देणारी अनेक झाडे पडली आहेत. जेणे करून अनेकवर्षांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे. तरोडी भागातील पांढऱ्या कांद्याचे हातचे आलेले पीक तुडुंब पाणी साचल्याने कुजून गेले. भाजीपाल्यासाठी टाकलेले मांडव मोडून पडले. भाज्यांची केलेली लागवड नष्ट झाली. स्थानिक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे अपर तहसीलदार नंदकिशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी करायला घेतले आहेत. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना प्रत्येकी किमान २५ हजारांची आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे वेन्सी मुनीस यांनी केली आहे.