नितिन पंडीत
भिवंडी - तौत्के चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम भिवंडीत (Bhiwandi) सकाळपासून दिसला. शहरासह ग्रामीण भागात सकाळपासून वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. तर वादळ वाऱ्याने शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्टीकरण मनपा प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
शहरातील अंजुरफाटा, नारपोली, कल्याण रोड, अशोक नगर, बाळा कंपाऊंड आदी भागात अतिवृष्टी व वाऱ्यामुळे २० झाडे पडली असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. त्यापैकी ११ झाडे उद्यान विभाग व अग्निशमन विभागाच्या सहाय्याने उचलण्यात आलेली आहेत व उर्वरित ९ झाडे उचलण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान धामणकर नाका अंजुरफाटा मार्गावर असलेल्या पारसिक बँक समोर भलं मोठं झाड पडल्याची घटना घडली आहे. हे झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घटनास्थळी मनपा आपत्ती व्यवस्थापन विभाग व अग्निशमन दल दाखल होत कटरच्या साहाय्याने झाड कापून बाजूला करण्यात आले. तर बाळा कंपाऊंड येथे देखील मोठे झाड पडल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत देखील कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र हे झाड थेट याठिकाणी उभ्या असलेल्या रिक्षावर पडल्याने रिक्षाचे मोठे नुकसान झाले होते.