मीरारोड - मीरा भाईंदरकरांनी चक्रीवादळाचा विध्वंसक अनुभव सोमवारी पहिल्यांदाच अनुभवला. शहरात इमारती - राहत्या घरांचे पत्रे तौत्के चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) पत्त्यांसारखे उडवून टाकले. तर ८० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडली. पाऊस आणि वारा सुरूच असल्याने रात्री उशिरापर्यंत झाडे पडणे, पत्रे उडणे आदी दुर्घटना सुरूच होत्या. मीरा भाईंदर मधील नागरिकांनी तौत्केच्या रूपाने पहिल्यांदाच चक्रीवादळाच्या भयानक स्वरूपाचा अनुभव घेतला. वादळीवारे आणि तुफान पावसामुळे सकाळपासून पत्रे उडून गेल्याच्या घटना घडत होत्या.
महापालिकेच्या भाईंदर, तलाव मार्गावरील प्रभाग कार्यालय, फॅमिली केअर रुग्णालय, भाईंदर स्थानक समोरील अनुसया इमारत, पूनम सागर वसाहत आदी अनेक इमारतींचे गच्चीवर लावलेले पत्रे वादळाने उडवून लावले. उत्तन - चौक भागात सुद्धा पत्रे उडाल्याच्या अनेक घटना घडल्या. पाली येथील चर्चच्या गच्चीवरील पत्रे सुद्धा हवेत उडाले. सुदैवाने पत्रे उडून कोणाला लागले नाहीत अन्यथा जीवावर बेतले असते. चक्रीवादळाचा इशारा आधीच दिला गेला असताना सुद्धा अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पत्रे उडून जाण्याच्या जास्त घटना घडल्या.
पत्रे उडण्यासह झाडे उन्मळून पडणे, झाडांच्या फांद्या पडणे या घटना सतत घडत होत्या. अग्निशनम दलाचे जवानांना तर पडलेली झाडे हटवण्याच्या कामात उसंत मिळत नव्हती. जेणे करून पडलेली झाडे हटवण्यास विलंब होत होता. भाईंदर पश्चिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६० फुटी मार्गावरील रिद्धीसिद्धी इमारती समोरील भले मोठे झाड उन्मळून खाली उभ्या असलेल्या रिक्षावर पडले. रिक्षाचे यात नुकसान झाले. भाईंदर पोलीस ठाणे आवारातील मोठे झाड पोलीस ठाणे इमारतीवर पडले. गोडदेव नाका येथे रस्त्यावरच मोठे झाड पडले. शहरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडण्यासह झाडांच्या फांद्या पडण्याच्या असंख्य घटना घडल्या आहेत.