मीरारोड - तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae Cyclone) सोमवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मीरा भाईंदर शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात वादळी पावसाने वातावरण थंडगार होऊन नागरिकांना थंड दिलासा सुद्धा मिळाला आहे. तौत्के वादळामुळे वादळी वाऱ्यांसह सोमवारी मीरा भाईंदरमध्ये धुवांधार पाऊस बरसला. वीज आणि ढगांचा गडगडाट सुरू होता. मुसळधार पावसामुळे शहरात मात्र जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले होते. अनेक भागातील रस्ते, वसाहती व गावठाण भागात सुद्धा पाणी साचले.
मीरा भाईंदर शहरातील सखल भाग असलेल्या बहुतांश भागात पाणी साचून लोकांच्या घरात पाणी गेले. जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पावसाचे पाणी आले असून सामान भिजले आहे. अनेक दुकानांत पाणी शिरले. पावसाळ्याआधीच पावसाने शहर जलमल केल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली. वादळीवारे व पावसामुळे लोकांनी घरातच राहणे पसंत केले. रस्त्यावरील वाहतूक सुद्धा अगदीच तुरळक होती. पाणी साचलेल्या भागातील पाण्याचा निचरा करण्यासाठी पाणी उपसा करणारे पंप महापालिकेने लावले होते.
वाहनांमध्ये सुद्धा पाणी शिरल्याने लोकांचे नुकसान झाले. पालिकेची नालेसफाई एकीकडे सुरू असताना चक्रीवादळामुळे कोसळलेल्या पावसाने साचलेलं कचरा व गाळ वाहून नेण्याचे काम सुद्धा केले. तर लहान-मोठ्या गटार - चेंबरमध्ये कचरा अडकला होता तो काढण्याचे काम सफाई कामगार करत होते. नैसर्गिक खाड्या, ओढे व नाल्यांवरील अतिक्रमण तसेच बेकायदा भरावामुळे पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. शिवाय शहरातील मोकळ्या पाणथळ व पाणी साठवून ठेवणाऱ्या भागातील बेकायदा भराव व अतिक्रमणे सुद्धा पाणी पोहचण्यास कारण ठरले.