मीरा रोड : तौक्ते चक्रीवादळाच्या गर्तेत अडकलेली भाईंदरच्या पाली गावातील न्यू हेल्प मेरी ही मच्छिमार बोट मंगळवारी रात्री सुखरूप परतली. नाखवा जस्टिन डायमंड मिरांडा यांनी वादळावर मात करून तीन दिवसभर समुद्रात वादळाशी संघर्ष करत स्वतःसह पाच खलाशी यांचे जीव वाचवत बोटीने किनारा गाठला.
चक्रीवादळाच्या इशाऱ्याने रविवारपर्यंत उत्तन, पाली व चौक येथील सर्वच मच्छीमार बोटी परतल्या. पण, मिरांडा यांची बोट वादळात अडकली. बोटीवर त्यांचा मुलगा जस्टिन हा नाखवा व अन्य ५ खलाशी होते. रविवारी बोट ओएनजीसीच्या वापरात नसलेल्या इंधन विहिरीच्या रिंगजवळ होती. त्यावेळी त्यांना तेथेच थांबा किंवा डहाणूचा समुद्रकिनारा जवळ असल्याने तेथे आश्रयाला जा अशा सूचना होत्या. परंतु, जस्टिन हा बोटीसह भाईंदर किनारी येण्यास निघाला. परंतु सोमवारी बोट वादळात ओढली जाऊ लागली. वायरलेसवरून तो सतत कुटुंबीयांशी संपर्कात होता.
तटरक्षक दलाचे हेलिकॉप्टर बचावासाठी गेले खरे; पण प्रचंड वाऱ्यामुळे ते माघारी फिरले. वादळाने खवळलेल्या समुद्रात बोट टिकवून ठेवण्यासाठी तीन नांगर तुटले. शेवटी अन्य दोरखंड एकत्र करून त्याचा वापर केला. बोटीचे स्टिअरिंग बिघडल्याने जस्टिनने खवळलेल्या समुद्रात जाऊन बोटीची दुरुस्ती केली. माझ्या मुलाने वादळावर मात करून स्वतःसह पाच खलाशी आणि बोटीला परत घेऊन आला ही अभिमानाची गोष्ट आहे, असे डायमंड मिरांडा यांनी सांगितले.
नौदलाच्या हॅलिकॉप्टरचे भाईंदरला इमर्जन्सी लँडिंग
तौक्ते चक्रीवादळामुळे मंगळवारीही वारा व पाऊस जोरात असताना नौदलाचे एक टेहळणी करणारे हेलिकॉप्टर वादळी वाऱ्यांमुळे वैमानिकास भाईंदरच्या पाली येथील जेटीवर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टर उतरल्याचे कळताच मच्छीमारांनी ते पाहण्यासाठी किनाऱ्यावर गर्दी केली होती. जवळपास २० मिनिटे थांबलेले हेलिकॉप्टरनंतर पुन्हा मुंबईच्या दिशेने रवाना झाले. चक्रीवादळामुळे झालेल्या परिणामांची पाहणी करण्यासाठी ते फिरत होते; परंतु वादळामुळे वातावरण ढगाळ होऊन जोरदार वारा, पाऊस असल्याने वैमानिकाने ते जेटीवर उतरवल्याचे सांगण्यात आले.