नितिन पंडीत
भिवंडी - तौत्के चक्रीवादळामुळेभिवंडीत सोमवारी सकाळपासून जोरदार सोसाट्याचा वारा व पावसाने हजेरी लावली होती. या वादळ वारा व पावसामुळे शहरात ठिकठिकाणी झाडे कोसळल्याची, घरांच्या छतांची पत्रे फुटल्याच्या घटना घडल्या असून शहरातील पूर्व भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या २० दशलक्ष लीटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीची काँक्रेट शिडीचा वरचा भाग तुटून पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही हानी झाली नाही.
पाण्याच्या टाकीची सध्या दयनीय परिस्थिती झाल्याने मनपा प्रशासन या पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल देखील काँग्रेस नगरसेवक अरुण राऊत यांनी उपस्थित केला आहे. भिवंडी पालिका कार्यक्षेत्रात आय. जी. एम. रुग्णालय शेजारी पालिकेने सुमारे ४० वर्षापूर्वी २० दशलक्ष लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली असून या टाकीतून भिवंडी पूर्व विभागातील कार्यक्षेत्रात जलवाहीनीद्वारे पाणी पुरवठा होत असतो.
सदर पाण्याच्या टाकीची निगा व दुरुस्ती न राखल्याने व वेळोवेळी तिची डागडुजी न केल्याने सध्या टाकीची अत्यंत दयनीय स्थिती झाली असून टाकीच्या स्लॅब व खांबांना चिरा पडलेल्या असून काही ठिकाणी स्लॅबचे प्लॅस्टर ही निखळून पडले आहे. त्यातच सोमवारी या टाकीची काँक्रेट शिडीचा काही भाग तुटल्याने भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी आतातरी लवकरात लवकर या टाकीची दुरुस्ती मनपा प्रशासनाने करावी अशी मागणी नगरसेवक अरुण राऊत यांनी केली आहे.