ठाणे : ठाणे महापालिकेने वसुलीसाठी विविध मार्गांचा अवलंब केल्यानंतर मालमत्ता कर, एलबीटी, शहर विकास विभाग आदींसह इतर काही महत्वाच्या विभागांची वसुली मागील वर्षीच्या तुलनेत अधिक झाली आहे. मालमत्ताकराची वसुली मागील वर्षीच्या तुलनेत ५३.५४ कोटींपेक्षा अधिक झाली आहे. दुसरीकडे शहर विकास विभाग, जाहिरात विभाग, अग्निशमन दल आदींची वसुली मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे.ठाणे महापालिकेमार्फत यंदा विविध करांची वसुली करण्यासाठी नाना शकला अवलंबविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये त्यांना काही अंशी यशही आले आहे. मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी काही ठिकाणी सील ठोकण्यात आले तर काही ठिकाणी पालिकेने जप्तीची कारवाईही केली. त्यामुळे मालमत्ता कर विभागाला यंदा ५५० कोटींचे लक्ष्य दिले असतांना या विभागाने आतापर्यंत एप्रिल ते २२ आॅक्टोबर या कालावधीत २५१.३१ कोटींची वसुली केली आहे. मागील वर्षी हीच वसुली १९७.७७ कोटीं एवढी होती. मागील वर्षीच्या तुलनेत ही वाढ ५३.५४ कोटींनी अधिक आहे. स्थानिक संस्था कर बंद झाला असला तरी, मागील वर्षीच्या तुलनेत या विभागामार्फत १३६.८८ कोटींची जास्तीची वसुली झाली आहे. मागील वर्षी या कालावधीत ३८६.३९ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र ५२३.२७ कोटींची वसुली पालिकेने केली आहे.शहर विकास विभागाकडून मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ७० कोटींची कमी वसुली झाली आहे. मागील वर्षी या विभागामार्फत आतापर्यंत २७१.५६ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र ती २००.९८ कोटींवर गेली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा १८.५२ कोटींनी आघाडीवर आला आहे. मागील वर्षी या विभागाने ९.४१ कोटींची वसुली केली होती. यंदा मात्र या विभागाने केवळ २७.९३ कोटींची वसुली केली आहे. जाहिरात विभागानेही यंदा घोर निराशा केली आहे. मागील वर्षी या विभागाकडून ९.३७ कोटींची वसुली झाली होती. यंदा मात्र त्यात ३.३७ कोटींची घट आली आहे. यंदा या विभागाने सहा कोटींचीच वसुली केली आहे. तसेच अग्निशमन विभागाकडून देखील मागील वर्षीच्या तुलनेत १४.१० कोटींची कमी वसुली केली आहे. मागील वर्षी या विभागाने ३४.१७ कोटींची वसुली केली होती. यंदा मात्र २०.०७ कोटींचीच वसुली झाली आहे.
ठाण्यात करवसुली दणक्यात, मालमत्ता विभागाची आघाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:37 AM