ठाणे: जकात चुकवून मालाची ने-आण करणाऱ्या वाहनांचा दंड कमी करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मुंबई महापालिकेचे उपकर निर्धारक व संकलक सुनिल बने यांना चार वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा लाचलुचपत विशेष न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी बुधवारी सुनावली. यातील अन्य एक आरोपी संजय लाहोटी याची मात्र निर्दोष मुक्तता झाली आहे.वाशी जकात नाक्यावर २९ मे २०१४ रोजी मुंबई महापालिकेच्या जकात सुनिल बने आणि संजय लाहोटी या अधिकाऱ्यांनी सात टेम्पो आणि त्यातील माल जकात न भरल्याच्या कारणाने जप्त केला होता. शुल्क भरून हे टेम्पो सोडण्याची मागणी तक्रारदाराने या दोन अधिकाºयांकडे केली होती. मात्र, टेम्पो सोडविण्यासाठी ३० लाखांचा दंड भरावा लागेल, असे त्यांनी सांगितले. तो दंड कमी करण्यासाठी दंडाच्या दहा टक्के म्हणजे तीन लाखांची मागणी या अधिकार्यांनी केली होती.
याच प्रकरणात या दोघांना ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले होते. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक अरूण सपकाळ यांनी तपास केला. सरकारी वकील म्हणून संजय मोरे यांनी तर पैरवी अधिकारी म्हणून हवालदार एस. ए.शाह आणि पारधी यांनी काम केले.