ठाणे : कोरोनाकाळात झालेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी एकीकडे ठाणे महापालिकेने करवसुलीवर भर देऊन मालमत्ता आणि पाणीपट्टीची वसुली समाधानकारक केली असताना, दुसरीकडे शहरातील ज्या बांधकामांना आतापर्यंत मालमत्ताकर लागला नव्हता, अशी तब्बल दीड हजार बांधकामे शोधून त्यांना कर लावल्याची माहिती प्रशासनाने दिली. या महिन्यात ही शोधमोहीम व्यापक स्वरूपात करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
ही दीड हजार बांधकामे शोधून प्रभाग समितीनिहाय त्यांचे वर्गीकरण करण्याचे कामदेखील सुरू केले आहे. येत्या १० ते १२ दिवसांत ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. या महिन्यात आणखी स्ट्रक्चर शोधून काढण्याचे नियोजन करून ही मोहीम अधिक वेगवान करणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
थकबाकीदारांवर होणार जप्तीची कारवाईठाणे महापालिका हद्दीत पाच लाख दोन हजार करदाते आहेत. त्यापैकी दोन लाख २२ हजार करदात्यांनी ३२२ कोटी इतकी घरपट्टी भरली आहे. आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मालमत्ताकर विभागाला या वर्षी ६०० कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. शहरातील मालमत्ताधारकांकडे १६० कोटी इतकी थकबाकी होती. त्यापैकी ४४.७५ कोटींची वसुली केली आहे.
११५ कोटींची थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान आहे. चालू वसुलीबरोबरच मागील थकबाकी वसूल करण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने राबविण्याचा निर्णय घेतला असून, मोठ्या थकबाकीदारांना नोटिसा पाठविल्या आहेत. ज्या मोठ्या गृहसंकुलांना महापालिकेत येणे जमत नाही त्यांनी जर वसुली वाहनांची मागणी केली तर महापालिकेचे पथक त्यांच्या दारात पोहोचत आहे. अशा प्रकारे ८८ लाख इतकी वसुली केली आहे. करभरणा केला नाही, तर जप्तीची नोटीस बजावली जाणार आहे. त्याचबरोबर वर्तमानपत्रातदेखील थकबाकीदारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.