ठाणे : उत्पन्न वाढीसाठी ठाणे महापालिका आता ढाबे, लॉन्स, ओपन स्पेससह रस्त्यावरील पार्किंगवर करआकारणी करणार आहे. स्थायी समितीनेच ही नवी करवाढ सुचविली आहे. शिवाय ज्याची मंजुरी दिली त्याच आकाराचा जाहिरात फलक लावण्याची सूचना करून जाहिरात संस्थांना चाप लावला आहे. मंगळवारी महासभेस सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ही नवी करवाढ सुचविली आहे.
कोरोनामुळे बांधकाम व्यावसायिकांना फटका बसला असला तरी ही परिस्थिती सुधारणार असल्याने शहरविकास विभागाकडून जास्तीचे उत्पन्न गृहीत धरले आहे. तर परिवहन सेवेसाठी ३५ कोटींची वाढ प्रस्तावित केली आहे.
रांचे पुनपृष्ठीकरण करतांना प्रभाग समितीनिहाय ज्या प्रभाग समितीमधील चरांच्या पुनपृष्टीकरणासाठी रस्ता फोड फी जमा झाली आहे, त्या प्रभाग समितीसाठी त्या प्रमाणात निधी द्यावा, रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी अंदाज खर्च तयार करताना त्यामध्ये पाणीपुरवठा, विद्युत व मलनि:सारण या विभागाकडील कामांचा समावेश करून रस्ते बांधकामांचा एकत्रित अंदाज खर्च तयार करावा, असे सुचविले आहे.
महापालिकांच्या शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे, त्या शाळा प्रथम टप्प्यात डिजिटल कराव्यात, शाळा दुरुस्तीसाठी १६ कोटी, बालवाड्या दुरुस्तीसाठी तीन कोटींची तरतूद प्रस्तावित केली असून तर नवीन शाळा बांधकामांसाठी १३ कोटी ७१ लाखांची भरघोस तरतूद केली आहे. महिला बालकल्याण कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित तरतूद कमी केली होती. ती आता पुन्हा २५ कोटी केली आहे. तसेच दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी १७ कोटी, महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र कक्ष तयार करून खोली तीच्यासाठी ही संकल्पना राबविण्यासाठी ७५ लाखांची तरतूद प्रस्तावित केली आहे.
भांडवली खर्चामध्ये वाढ
क्लस्टर संक्रमण शिबिर बांधण्यासाठी नव्याने १५ कोटी ७५ लाख, रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरणासाठी वाढीव ३४ कोटी १० लाखासह एकूण ६४ कोटी १० लाखांची तरतूद, युटीडब्ल्युटी रस्ते नुतनीकरणासाठी वाढीव २९ कोटी ४० लाखासह ५९ कोटी ४० लाखांची तरतूद, विकास आराखड्यातील रस्ते बांधणीसाठी १३८ कोटी, नाले बांधणीसाठी १६ कोटी ६५ लाख वाढीव तरतुदीसह ४१ कोटी ६५ लाख तरतूद, प्रभागात मलवाहिन्या टाकणे व हाऊस कनेक्शनसाठी २० कोटी तरतूद होती ती २१ कोटी केली असून अमृत योजनेचे काम प्रगतीपथावर असल्याने यात २० कोटी वाढ करून ६० कोटींची तरतूद केली आहे.
कौसा रुग्णालयाच्या वाढीव कामासाठी २९ कोटी, शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन ठाण्यासाठी धरण गरजेचे असल्याने त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. परंतु त्यासाठी तरतूद मात्र केलेली नाही.
रायलादेवी तलाव परिसर विकासासाठी वाढीव १६ कोटी ४० लाखांसह १८ कोटींची तरतूद, बाळकुम येथे कलरकेम कंपनीमध्ये सुविधा भुखंडावर तसेच मनोरमानगर येथे दवाखान्यासाठी आरक्षित भूखंडावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचे प्रस्तावित आहे. तसेच प्रभाग क्रमांक २८ मध्ये अद्ययावत रुग्णालय व आरोग्य केंद्र उभारणे या कामांसाठी २८ कोटींची वाढीव तरतूद केली आहे.
मांसुदा तलाव सुशोभीकरणासाठी वाढीव ७ कोटी ५० लाख, थीम पार्क विकसित करण्यासाठी वाढीव १० कोटी २० लाख, ढोकाळी येथील शरदचंद्र पवार स्टेडियममध्ये खेळाडूंच्या वास्तव्यासाठी तळ अधिक दोन मजल्यांची इमारत प्रस्तावित करून त्यासाठी पाच कोटी, विद्युत संयत्रे स्थलांतरित करणे १७ कोटी, बाळकुम येथील तरण तलावाच्या ठिकाणीदेखील राहण्यासाठी वसतिगृह इमारत उभारण्यासाठी ८ कोटी, दादोजी कोंडदेव क्रीडागृहात हायमास्ट बसविण्यासाठी १२ कोटी, कळवा रुग्णालय नूतनीकरण व नवीन इमारत बांधणीसाठी दोन कोटी ५० लाख, खिडाकाळी तलाव व शिवमंदिर परिसर सुशोभीकरणासाठी पाच कोटी, लोकप्रतिनिधींच्या प्रभागातील तातडीची व अत्यावश्यक कामे करण्यासाठी प्रती सदस्य २८ लाख ८२ हजार प्रमाणे नगरसेवक स्वेच्छा निधी अशा प्रकारे भांडवली खर्चात वाढ प्रस्तावित केली आहे.