भार्इंदर : पूर्वेकडील गोल्डन नेस्ट ते अंधेरी मेट्रो स्थानकांदरम्यान खाजगी टॅक्सीचालकांकडे वाहतूक सेनेचा शहर संघटक गफ्फार पिंडारे याने ५० हजारांचा वर्षाचा हप्ता मागितल्याने त्रस्त झालेला टॅक्सीचालक राजेश ढामरे याने शुक्रवारी सकाळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. ही घटना गोल्डन नेस्ट टॅक्सीतळावरच झाली. राजेशने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याच्या सहकाऱ्यांनी रोखल्याने पुढील अनर्थ टळला. त्याला शताब्दी रुग्णालयात दाखल केले आहे. १० ते १५ वर्षांपासून गोल्डन नेस्ट येथे सुमारे १०० खाजगी टॅक्सीचालक व्यवसाय करीत आहेत. तसेच काळी-पिवळी टॅक्सींचाही तळ तेथेच आहे. प्रवासी, जलद सेवेसाठी खाजगी टॅक्सींना पसंती देतात. त्यामुळे गोल्डन नेस्ट ते अंधेरी येथील मेट्रो स्थानकापर्यंत खाजगी टॅक्सीचालक प्रवासी वाहतूक करतात. प्रसंगी जादा प्रवासीही ते घेऊन जातात. अलीकडेच वाहतूक विभागाने टॅक्सींच्या प्रवासी वाहतुकीवर अंधेरी ते वांद्रेदरम्यान कारवाई सुरू केली. त्यात येथील खाजगी टॅक्सीचालकांवर कारवाई केली जात असल्याने त्यामागे गफ्फारच असल्याचा आरोप खाजगी टॅक्सीचालकांनी केला. पुढे ही कारवाई दहिसरपर्यंत होणार असल्याने ती टाळण्यासाठी पैसे मोजावे लागतील, असा दावा करीत गफ्फारने येथील खाजगी टॅक्सीचालकांकडे वार्षिक ५० हजार रुपये हप्ता मागण्यास सुरुवात केली. त्याला टॅक्सीचालकांनी नकार दिल्याने तो वाहतूक पोलिसांमार्फत टॅक्सीचालकांवर कारवाईचा सूड उगारू लागला. काही दिवसांत किमान ३० ते ४० टॅक्सीचालकांवर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई केली आहे. गुरुवारी तर १५ टॅक्सीचालकांचे मेमो फाडण्यात आले. या रोजच्या कारवाईचा कंटाळा आला असतानाच गफ्फारच्या ५० हजारांच्या हप्तेखोरीचा तगादा टॅक्सीचालकांमागे लागला होता. रोजच्या कमाईवर उदरनिर्वाह होत असल्याने राजेशने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला. या तयारीत तो गोल्डन नेस्ट तळावर आला. त्याने स्वत:ला पेटवण्यासाठी अंगावर रॉकेल ओतून घेतले. स्वत:ला पेटवण्यासाठी लायटर खिशातून काढताच त्याच्या सहकाऱ्यांनी रोखले. त्यावेळी राजेश हा गफ्फार याच्या त्रासामुळेच स्वत:ला पेटवून घेत असल्याचे तो सांगत होता. गफ्फारवर पोलीस ठोस कारवाई करत नाही, तोपर्यंत टॅक्सी न चालवण्याचा तसेच आंदोलनाचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)कुणाकडेही पैसे मागितले नाहीमी कुणाकडेही पैशांची मागणी केलेली नाही, असे शिवसेनेच्या महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचा शहर संघटक गफ्फार पिंडारे यांनी सांगितले. उलट, टॅक्सीवाले क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करतात. त्यामुळे त्यांच्यावर वाहतूक विभागाकडून कारवाई होते. संघटनेचा पदाधिकारी म्हणून वाहतूक विभाग मला बोलवून टॅक्सीचालकांना कायद्याचे पालन करण्यास सांगतात. ते होत नसल्यानेच कारवाई केली जाते. त्यात माझा सहभाग नाही, असेही तो म्हणाला. गफ्फार याने आमच्यावरील कारवाई टाळण्यासाठीच वार्षिक ५० हजारांचा हप्ता मागण्यास सुरुवात केली. तो देण्यास नकार दिल्याने त्याने कारवाईच्या माध्यमातून आम्हाला त्रास देणे सुरू केले आहे. -सैफ शेख, टॅक्सीचालक टॅक्सी अंधेरीच्या गुंदवली येथे असताना गफ्फारच्या गुंडांनी टॅक्सीची चावी जबरदस्तीने काढून घेत पोलिसांना कारवाई करण्यास लावली. त्याची दादागिरी वाढली असून आम्हाला संरक्षण मिळावे व नियमित टॅक्सी चालवण्याची परवानगी मिळावी. - माविया पटेल, टॅक्सीचालकगफ्फारने कुर्ला येथून गुंड आणले असून त्यांच्यामार्फत पैशांसाठी आमच्यावर दबाव टाकला जात आहे. -सद्दाम शेख, टॅक्सीचालक गोल्डन नेस्ट स्टॅण्डवर अनेक वर्षांपासून टॅक्सी सुरू आहे. असा प्रकार कधी घडला नाही. बेकायदा पैसे मागणे गैर असून हातावर पोट असलेल्या टॅक्सीचालकांना त्रास सहन करावा लागतो. - स्वप्ना संत, गृहिणी
टॅक्सीचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
By admin | Published: March 18, 2017 3:50 AM