ठाणे : साडेदहा हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेली व राज्यातील जिल्हा बँकांमध्ये सर्वात श्रीमंत बँक म्हणून ओळख असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर व भाजप पुरस्कृत सहकार पॅनलने बँकेच्या २१ संचालकांपैकी १९ जागांवर विजय मिळवून बँकेवर पुन्हा वर्चस्व सिद्ध केले आहे. राज्यातील सत्तारूढ महाविकास आघाडी मित्रपक्षांच्या महाविकास परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला. त्यांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे.
टीडीसीसी बँकेच्या २१ संचालकांपैकी सहा संचालक बिनविरोध विजयी झाले होते. उर्वरित १५ संचालकांच्या निवडणूक रिंगणात ४६ उमेदवार होते. त्यांना तीन हजार ६२ पैकी दोन हजार ७९१ (९१ टक्के) मतदारांनी मंगळवारी मतदान केले होते. या मतदानाची बुधवारी येथील एम.एच. हायस्कूलमध्ये मतमोजणी पार पडली. या विजयी उमेदवारांमधून आता पुढील अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड आगामी १५ दिवसांत घेता येईल, असे निवडणूक निर्णय अधिकारी दिगंबर हौसारे यांनी लोकमतला सांगितले.
या बँकेवर आमदार हितेंद्र ठाकूर यांचे समर्थक व बँकेचे विद्यमान अध्यक्ष सहकार पॅनलमधील राजेंद्र पाटील प्राथमिक कृषी पतपुरवठा वसई तालुका या मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते. पाटील यांच्यासह विद्यमान संचालक जव्हार येथून दिलीप पटेकर, अंबरनाथ येथून राजेश पाटील, माजी आमदार अमित घोडा हे डहाणूमधून व मोखाडा तालुक्यातून बाबूराव दिघा या सहकार पॅनलच्या पाच संचालकांची बिनविरोध निवड झाली होती. महाविकास परिवर्तन पॅनलचे विद्यमान संचालक बाबाजी पाटील हे ठाणे येथून बिनविरोध विजयी झाले आहेत. सहकार पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यात सहकारचा प्रदीर्घ अनुभव असलेले भाजपचे आमदार किसन कथोरे, आमदार संजय केळकर आणि आमदार रवींद्र चव्हाण यांचा अनुभव कामी पडल्याचे या निवडणुकीत चौथ्यांदा निवडून आलेले व ४४४ मते घेतलेले विद्यमान उपाध्यक्ष भाऊ कुऱ्हाडे यांनी सांगितले.
-------