लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांपैकी सर्वात श्रीमंत बँक म्हणून ओळख असलेल्या दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेच्या निवडणुकीचा प्रचार सध्या रंगात आला आहे. या बँकेच्या २१ संचालकांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी तीन हजार ६२ मतदार आहेत. यातील बहुतांशी मतदारांच्या सहमतीने काही उमेदवारांनी त्यांची पळवापळवी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदारांची यंदाची होळी व धूलिवंदन घराव्यतिरिक्त बाहेर पर्यटनस्थळीच रंगणार असल्याची चर्चा या प्रचाराचा कानोसा घेतला असता ऐकायला मिळाली.
टीडीसीसी बँकेच्या या निवडणुकीसाठी आमदार हितेंद्र ठाकूर यांचे समर्थक बँकेचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी बहुजन विकास आघाडी व भाजप पुरस्कृत उमेदवारांचे सहकार पॅनल तयार केले आहे, तर राज्याच्या सत्तेत एकत्र असलेल्या महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्या पुरस्कृत उमेदवारांचे महाविकास परिवर्तन पॅनल तयार करून पालकमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात येत आहे. बँकेच्या २१ संचालकांपैकी सहा संचालकांची बिनविरोध निवड झालेली आहे. यामुळे आता १५ संचालकांसाठी ३० मार्चला मतदान होणार आहे.
या बँकेच्या निवडणूक रिंगणात ४६ उमेदवारांना तीन हजार ६२ मतदारांना मतदान करावे लागणार आहे. दोन्ही पॅनलमध्ये प्रत्येकी १५ उमेदवारांसह उर्वरित १६ उमेदवार अपक्ष निवडणूक लढवत आहेत. मतदानाचा हक्क मिळालेल्या बहुतांशी मतदारांची सहमती मिळवून त्यांना काही उमेदवारांनी खंडाळ्यासह माळशेज घाटामध्ये, वसई परिसरात आणि काहींना गोव्याला फिरायला नेले आहे. मतदानाच्या दिवसापर्यंत या मतदारांना आता घरी येणे शक्य नाही. त्यामुळे त्यांची होळी व धूलिवंदन पर्यटनस्थळीच रंगणार आहे. मतदारांच्या या पळवापळवीनंतरही कोणत्या उमेदवारास किती मतदान झाले, यासाठी मात्र ३१ मार्चपर्यंत धीर धरावा लागणार आहे.
..........