कल्याण : कल्याण-मलंग रोडवरील द्वारली गावानजीक खड्ड्यात पडल्याने अण्णा (३५) यांचा बुधवारी अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे तेथील अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांना शुक्रवारी निवेदन देत खड्डे बुजवण्याची मागणी केली. खड्डे न बुजवल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. बोडके यांनी त्याची दखल घेत गावच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्यांना टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याची तयारी त्यांनी यावेळी दर्शवली.या बैठकीला नगरसेवक पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस, कार्यकारी अभियंता सुनील जोशी, प्रभाग अधिकारी शरद पाटील, पोलीस पाटील चेतन पाटील, रहिवासी मनोहर भोईर आदी उपस्थित होते. अण्णा यांच्या मृत्यूनंतर महापालिका खड्डे बुजवत नसल्याची टीका द्वारलीतील ग्रामस्थांनी केली. तर, खड्डे बुजवण्यास ग्रामस्थांचा विरोध असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाने दिले होते.बैठकीत पाटील म्हणाले, ग्रामस्थांचा विरोध खड्डे बुजवण्यास नसून रस्ता रुंदीकरणास आहे. द्वारलीतील २२ जणांची घरे कल्याण-मलंग रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित झाली आहेत. मात्र, त्यांना महापालिकेने भरपाई दिलेली नाही. ग्रामस्थांचा खड्डे बुजवण्यास विरोध असल्याची चुकीची माहिती देऊन महापालिका जबाबदारी झटकत आहे. रुंदीकरणात बाधित झालेल्यांना आर्थिक स्वरूपात मोबदला द्यावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर, आर्थिक स्वरूपाऐवजी टीडीआर स्वरूपात मोबदला देता येईल, असे बोडके म्हणाले.केवळ द्वारली येथील २२ जण बाधित नाहीत, तर भाल, आडिवली, ढोकळी, नांदिवली या गावांतील एकूण २१५ जण कल्याण-मलंग रस्त्याच्या रुंदीकरणात बाधित झाले आहेत. महापालिकेने त्यांनाही टीडीआर स्वरूपात मोबदला देण्याचा विचार करावा, असे पाटील यांनी सांगितले. रस्तेबाधितांना मोबदला देण्यासंदर्भात महापालिकेने कार्यवाही न केल्यास आंदोलनाच्या इशाºयावर ठाम असल्याचे पाटील यांनी सांगितले.
टीडीआर स्वरूपात मिळणार मोबदला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 2:42 AM