कुमार बडदेमुंब्रा : कोरोनाच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये मुंब्य्रात मृत्युदरात अचानक वाढ झाल्याने येथील एका कब्रस्तानमधील दफनभूमीची जागा संपुष्टात आल्याने अखेर १० जुलैपासून पुढील सहा महिन्यांसाठी ते दफनविधीसाठी बंद करावे लागले आहे.
अमृत परिसरातील या पावणेदोन एकर भूखंडावरील कब्रस्तानमध्ये कोरोनापूर्वी वर्षाला सर्वसाधारणपणे ७०० मृतदेह दफन करण्यासाठी येत होते. परंतु, अनेकांना उपचार वेळेत उपचार न मिळाल्याने तसेच काहींनी आजारांची तपासणी केल्यास अहवाल कोरोनाचा येईल की काय अनामिक भीतीने उपचार करून न घेतल्याने मुंब्रा आणि आजूबाजूच्या परिसरात कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांनी मृत्यू झालेल्यांचे प्रमाण कोरोनासाथीच्या सुरुवातीच्या काळात वाढल्याने मार्च ते ९ जुलै दरम्यानच्या अवघ्या सव्वाचार महिन्यांत या कब्रस्तानमध्ये एकूण ५५४ मृतदेह दफन करण्यात आले. यामध्ये मार्चमध्ये ७५, एप्रिलमध्ये ९१, मेमध्ये १६०, जूनमध्ये २६० आणि एक ते नऊ जुलैदरम्यान २२ मृतदेह दफन करण्यात आले. यामुळे १,६२५ मृतदेह दफन करण्याची क्षमता असलेल्या या कब्रस्तानमधील दफनभूमीची जागा संपुष्टात आल्याने कब्रस्तानची देखभाल करणाऱ्या विश्वस्त मंडळाला अखेर ते बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.