ठाणे : शासन पातळीवर वारंवार होत असलेल्या दुर्लक्षच्या निषेधार्थ आता कोचिंग क्लासेसचे शिक्षक उतरले आहेत.कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या ठरावानुसार, आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरविण्यात येणार आहे. अशी माहिती बुधवारी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, क्लासेसचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना संघटनेने आव्हान दिले आहे.
शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आता कोकण पदवीधर निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. याविषयी बुधवारी पत्रकार परिषद घेण्यात आली.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतिश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सचिन सरोदे, खजिनदार सुनिल सोनार, सहकार्यवाह रविंद्र प्रजापती,सदस्य - शैलेश सकपाळ, अनिल काकुळते, विनायक चव्हाण, संतोष गोसावी,आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सरोदे यांनी, गेल्या १४ वर्षापासून महाराष्ट्रातील क्लासेस संचालक म्हणजेच खाजगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करत आहे. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्याच्या हितासाठीही संघटना कार्यरत असुन अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडवण्यात याच क्लासेसचा वाटा आहे.
या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्याने कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्या आहेत. एवढेच काय तर आत्ताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्लासेसचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा केली, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. दुकाने कोणाचे बंद होतात हा येणारा काळच ठरवेल आणि याची प्रचिती उपमुख्यमंत्री यांना येईलच. परंतू आम्हाला शासनाकडे मिळत नसलेली दाद आणि वेळोवेळी होणारा आमचा अपमान याचा समाचार घेण्याचा निर्धार केला. त्यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, पुढच्या वर्षी होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणूक मध्ये संघटनेचा उमेदवार देऊन तो निवडून आणण्यासाठी चा ठराव एकमताने संमत करण्यात आला आहे. यासाठी आतापर्यत ५ हजार पदवीधर मतदारांची नोंदणी पूर्ण केली असुन येत्या काळात ४० हजार नोंदणी करण्याचा मानस संघटनेने व्यक्त केला आहे.