शहापूर : कधी सणासुदीमुळे तर कधी समारंभास मान्यवर उपलब्ध नसल्यामुळे नंतर निवडणूक आचारसंहितेमुळे अशा अनेक कारणांमुळे रखडलेल्या तालुक्यातील आदर्श शिक्षक गौरव समारंभास अखेर तब्बल सहा महिन्यांनी बुधवारी मुहूर्त मिळाला. या गुणगौरव समारंभास मानापमानाचे गालबोट लागले. निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रवादी,शिवसेना या पक्षातील प्रमुख पदाधिका-यांची नावे होती. मात्र भाजपाचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव तसेच अन्य पदाधिकारी यांची नावे छापली नाहीत. यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या कार्यक्र मास अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे खासदार कपिल पाटील उपस्थित राहू शकले नाहीत.दरवर्षी ५ सप्टेंबरला पंचायत समितीतर्फे होणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ येथील वैश्य समाज सभागृहात पंचायत समितीच्या सभापती शोभा मेंगाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्र मास ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, आमदार पांडुरंग बरोरा, मुरबाड पंचायत समितीचे उपसभापती सुभाष पवार, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा, ठाणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस(ग्रामीण) अध्यक्ष दशरथ तिवरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख मारु ती धिर्डे, काशिनाथ तिवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख नंदकुमार मोगरे तसेच नवनिवार्चित निवडून आलेले सदस्य उपस्थित होते.शिक्षकांच्या गुणगौरव समारंभ कार्यक्रम पत्रिकेवर शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षप्रमुख आणि पदाधिकारी यांची नावे छापली. परंतु या पत्रिकेवर जाणूनबुजून भाजपाचे तालुका अध्यक्ष जाधव यांचे नाव नसल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब दोन दिवसापूर्वी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी शहापूर पंचयात समितीच्या प्रशासना कडे नाराजी नोंदविली. तोपर्यंत निमंत्रण पत्रिका वाटून झाल्या होत्या. हे प्रकरण अंगाशी येईल म्हणून नव्याने निमंत्रण पत्रिका छापल्या. त्यात जाधव यांचे नाव छापण्यात आले.या संदर्भात भास्कर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या दबावाखाली येऊन आमची नावे वगळली, असा आरोप केला. गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना विचारले असता त्यांनी गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे बोट दाखवत सांगितले की मी नवीन आहे.
शिक्षक पुरस्कार : मानापमानाचा रंगला तास , पत्रिकेत नाव नसल्याने भाजपा पदाधिकारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 6:32 AM