पंकज रोडेकर, ठाणेशिक्षणाचे धडे देता-देता अमली पदार्थाची विक्री करण्याकडे वळलेल्या शहापुरातील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकाला पोलिसांनी गजाआड केले आहे. विदर्भात अध्यापनाची पदवी संपादन करून १५ ते २० वर्षांपूर्वी राजकुमार (नाव बदलले आहे) मुंबईत आला. टिटवाळ्यात वास्तव्यास असतानाच तो शहापूर तालुक्यात एका खासगी इंग्रजी शाळेत इंग्रजी विषयाचा शिक्षक म्हणून रुजू झाला. इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या राजकुमारला २०१२ मध्ये मुंबई पोलिसांनी चरसप्रकरणीही अटक केली होती. मात्र, त्या वेळी त्याच्याकडे मुद्देमाल मिळाला नसल्याने तो जामिनावर बाहेर आला. त्यामुळे त्याची हिम्मत वाढली. तो श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे एका सहलीला गेला होता. तेथेच त्याची अमीन नामक व्यक्तीशी ओळख झाली. त्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. याचदरम्यान, अमीनने त्याला नातेवाइकाला कॅन्सर झाल्याचे सांगितले. त्या वेळी राजकुमारने मुंबईत यावर उपचार होतो, असे सांगितले. त्यानुसार, अमीन उपचारासाठी मुंबईत आला. टाटा रुग्णालयात अमीनबरोबर गेला असताना त्याची ओळख (या गुन्ह्यातील त्याचा साथीदार) प्रेमचंद्र (नाव बदलले आहे) शी झाली. तो आपल्या नातेवाइकाला रुग्णालयात उपचारार्थ घेऊन येत होता. तो व्यवसायात कंगाल झाला होता. दोघांनाही पैशांची चणचण असल्याने त्यांनी अमीनच्या मदतीने गांजाचा व्यवसाय सुरू केला. त्यात त्यांना बरेच यशही आले. याचदरम्यान, त्यांच्याकडे असलेल्या १२ किलोच्या गांजासाठी ते ग्राहक शोधत होते. ही माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांना मिळाली. त्यानुसार, पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या पथकाने सापळा रचून त्यांना मुद्देमालासह अटक केली. त्यांच्या चौकशीत प्रेमचंदकडे विविध शासकीय शिक्के आणि दोन शासकीय ओळखपत्रे असल्याचे समोर आले. यामधील एक ओळखपत्र प्रेमचंदने स्वत:च्या नावाचे बनवले होते. तर, दुसऱ्या एका ओळखपत्रावर त्याने दुसऱ्याचे नाव टाकून स्वत:चा फोटो चिकटवला होता. श्रीनगरमधून येणारा गांजा बहुधा ते रस्त्यांनी आणत असावे. हा माल आणताना वाहन तपासणीत अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी शासकीय ओळखपत्र तयार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पैशांच्या लालसेने शाळेत शिकवणारा शिक्षक या गुन्ह्यात अडकला. तो आणि त्याचा साथीदार कारागृहात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अमली पदार्थामुळे शिक्षक कारागृहात
By admin | Published: January 19, 2016 2:08 AM