भिवंडी : खाजगी शाळांमधून विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या खरेदीसाठी शाळा प्रशासनाकडून सक्ती केली जात असून त्याची विद्यार्थ्यांनी अंमलबजावणी केली नाही म्हणून संतप्त झालेल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. हा प्रकार शेठ जुग्गीलाल पोद्दार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये घडला. दोन शिक्षकांविरोधात पालकांनी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. शमीम व ममता अशी शिक्षकांची नावे आहेत. दरम्यान, याबाबत शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
शेठ जुग्गीलाल शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणारा देव पंकज परमार (११) या विद्यार्थ्याची मागील वर्षाची सहा हजार फी भरलेली नसल्याने वर्गशिक्षक शमीम यांनी देव या विद्यार्थ्याला सहावीच्या वर्गात बसवून मारहाण केली. जर शाळेची फी भरली नाही तर ‘तुला आणखी खालच्या वर्गात बसवेन’ असे बोलून अपमानित केले. सातवीच्याच वर्गातील दुसऱ्या तुकडीत शिकणारा मानस लालचंद यादव (१३) या विद्यार्थ्यास त्याच्या पालकांनी शाळेतून वह्या खरेदी न करता बाहेरून खरेदी करून दिल्या. याचा राग वर्गशिक्षिका ममता यांना आल्याने त्यांनी मानस यास लाकडी पट्टीने मारहाण केली. बाहेरील खरेदी केलेल्या वह्या या शाळेमध्ये चालणार नाहीत. जर पुन्हा असे केले तर ‘तुला पुन्हा मारेन’ अशी धमकी दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्याने या घटनांची माहिती आपल्या पालकांना दिली.
या प्रकाराबाबत पालकांनी एमआयएमचे शहराध्यक्ष शादाब उस्मानी व सरचिटणीस अॅड. अमोल कांबळे यांच्याकडे तक्र ार केली असता त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करून शाळेच्या या कृत्याविरोधात पोलिसांकडे तक्र ार नोंदवण्याचा निर्णय घेतला. नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांची पालकांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन शाळा प्रशासनाकडून केल्या जाणाºया अरेरावीचा पाढा वाचला. यावेळी पोलिसांनी विद्यार्थ्यांचे जबाब घेऊन ममता व शमीम यांच्याविरोधात दाखल केला आहे.