कल्याण - कल्याण डोंबिवली महानगर पालिकाच्या वतीने कल्याण तालुका कालाध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण कोर्टाच्या मागील बाजूची भिंत कलाशिक्षकांच्या सहकार्याने शुशोभित करण्यात आली. विस्तार अधिकारी विजय सरकटे यांच्या अथक परिश्रम आणि अमूल्य सहकार्य या माध्यमातून संपूर्ण कल्याण डोंबिवली शहरामध्ये अनेक दिवसांपासून अनेक शाळांच्या भिंती स्वच्छतेचे संदेश देण्यासाठी रंगविण्यात आल्या. असंख्य शाळांनी यात उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. विद्यार्थांनी रंगांसोबत खेळत स्वच्छतेचा संदेश दिला व स्वतःही अनुभव घेत स्वच्छतेची शपथ घेतली.
यातच आज चक्क कालाशिक्षक कल्याणच्या भिंती रंगवण्यासाठी ब्रश आणि रंग घेऊन सज्ज झाले. कल्याण कोर्टामागील भली मोठी निर्जीव भिंत त्यांनी आपल्या कल्पनेतून स्वच्छतेसह अनेक सामाजिक संदेश देत जिवंत व बोलकी केली. या कामी कल्याण तालुका कालाध्यापक संघाचे मोलाचे योगदान लाभले. या सर्व कलाशिक्षकांना एकत्रित आणणे व मार्गदर्शन करत अमोल पाटील अध्यक्ष कल्याण तालुका कालाध्यापक संघ, संघाचे सचिव विनोद शेलकर , सदस्य राजकुमार कोल्हे, प्रशांत मोरे, विभावरी माने, यांच्या सह अनेक कालाशिक्षकांचे विशेष सहाय्य लाभले. तसेच या सर्व शिक्षकांना स्थानिक नगरसेवक सचिन खेमा यांनीही मोलाचे सहकार्य केले.