कल्याण : यूकेमध्ये शिपवर कॅप्टन म्हणून काम करत असल्याची बतावणी करून फेसबुकवरून ओळख वाढवत एका ३८ वर्षीय शिक्षिकेला सुमारे साडेबारा लाखांचा गंडा घातल्याची घटना कल्याणात उघड झाली आहे. याप्रकरणी सिंग कुमार आणि नासीर अली यांच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.पश्चिमेतील टावरीपाडा परिसरात राहणाऱ्या सुरेखा (३८, नावात बदल) या शिक्षिकेची सिंग कुमार नावाच्या व्यक्तीसोबत १० मार्च २०१९ रोजी फेसबुकद्वारे मैत्री झाली. त्यानंतर, दोघांमध्ये चॅटिंग सुरू असताना मोबाइलद्वारे ते एकमेकांच्या संपर्कात आले. कल्याणमध्ये घर घ्यायचा विचार करत असून माझ्याकडील ५० हजार यूके डॉलर्स तुला पाठवतो, असे त्याने सुरेखाला सांगितले. त्यानंतर, १८ मार्चला सुरेखा यांना एका व्यक्तीने संपर्क साधत दिल्ली येथील कस्टम आॅफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. फोन करणाºया व्यक्तीने पोलंडवरून आलेले पार्सल क्लिअरिंग करायचे असल्यास ४७ हजार रुपये भरावे लागतील, असे सुरेखा यांना सांगितले. ही माहिती सुरेखा यांनी कुमारला दिली असता त्याने कसेही करून पार्सल सोडवून घेण्यास सांगितले. कुमारच्या सांगण्यावरून सुरेखा यांनी ४७ हजार रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर सुरेखा यांना एक मेल आला, ज्यात पार्सलमध्ये पैसे असून त्यासाठी अॅण्टी मनी लॉडरिंग सर्टिफिकेट घ्यावे लागेल, असे लिहिले होते. त्यासाठी नासीर अली नावाच्या व्यक्तीने सुरेखा यांच्याशी संपर्क साधून एक लाख १५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, सुरेखा यांनी ही रक्कम त्या खात्यावर जमा केली. त्यानंतर, सुरेखा यांना पुन्हा मेल आला, ज्यात ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून त्यासाठी तीन लाख ६८ हजार रुपये जमा करावे लागतील, असे लिहिले होते. त्यानंतर, कुमार आणि त्याच्या साथीदाराने पार्सल जप्त करण्याची भीती घालून वेगवेगळ्या खात्यांवर १२ लाख २४ हजार रुपये भरायला भाग पाडले.>युनायटेड किंगडममध्ये नोकरीला असल्याची बतावणी करणाºया आरोपी कुमार याने कल्याणची पीडित शिक्षिका सुरेखा हिच्याशी फेसबूकवर मैत्री केली होती. कुमारकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेखा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
शिक्षिकेची साडेबारा लाखांची फसवणूक, फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 1:00 AM