कल्याण : दोन गटांतील वादातून शिक्षिकेच्या कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी टिटवाळ्यानजीकच्या राया गावात घडली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.राया गावातील शेतकरी गणेश दळवी याची पत्नी अलका या सरकारी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना दोन मुले आणि तीन मुली आहेत. शनिवारी दुपारी अलका शाळेतून मुलासोबत दुचाकीवरून घरी येत होत्या. यावेळी गावातील एका समाजातील एका तरुणाने रस्त्यात गाडी आडवी उभी करून जुने भांडण उकरून काढले. त्यानंतर, जमावाने दळवी यांच्या घरी अलका व त्यांच्या मुलींवर हल्ला केला. तसेच घराचीही मोडतोड केली. यावेळी बचावासाठी दळवी कुटुंबीयांनी स्वत:ला घरात कोंडून या घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दळवी कुटुंबीयांची सुटका केली. हल्ल्यातील जखमींना रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, गावातील बहुसंख्येने असलेला समाज आपल्याला वारंवार त्रास देत आहे. त्यातूनच असे प्रकार नेहमी होत आहेत, असा आरोप दळवी कुटुंबाने केला आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड यांनी दिली.
शिक्षिकेच्या कुटुंबाला बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 3:24 AM