कल्याण : शालेय साहित्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केलेली रक्कम केडीएमसीच्या एका शाळेतील शिक्षकांनी परस्पर लाटल्याची तक्रार सोलास इंडिया ऑनलाइन या सामाजिक संघटनेच्या राष्ट्रीय समन्वयक डॉ. रूपिंदर कौर यांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. या शिक्षकांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर, शिक्षण मंडळ प्रशासनाने याचे खंडन केले आहे.पश्चिमेतील वाडेघर येथील केडीएमसीच्या सावित्रीबाई फुले शाळेत १० ते १२ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शालेय साहित्यखरेदी करण्यासाठी सरकारकडून २०१८ च्या शैक्षणिक वर्षात प्रत्येकी दोन हजार ५८१ रुपये जमा करण्यात आले होते. मात्र, शिक्षकांनी परस्पर या बँक खात्यातून पैसे काढून घेतले आहेत. आपल्या पाल्याला गणवेश, बूट, रेनकोट, पायमोजे यापैकी कोणतेही शालेय साहित्य मिळाले नसल्याची तक्रार पालकांनी केली होती. अनेक पालकांनी याबाबत शिक्षकांना जाब विचारला असता शिक्षकांनी हे पैसे कंत्राटदाराला दिले आहेत. विद्यार्थ्यांना एकत्रित शालेय साहित्य दिले जाणार असल्याचे सांगितल्याची माहिती पालकांनी दिली. मात्र, शैक्षणिक वर्ष उलटूनही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाला नाही.याबाबतची माहिती मिळताच कौर यांनी या विद्यार्थ्यांकडे चौकशी केली असता शिक्षकांनी आपल्याकडून बँकेच्या व्हाउचरवर सह्या घेतल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली रक्कम एकाच दिवशी काढल्याचे कौर यांना आढळले. मात्र, त्यांच्या अशिक्षित आदिवासी पालकांना माहितीही नसल्याचे कौर यांना समजले. त्यानंतर, बँकेत विद्यार्थ्यांची गर्दी होईल, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्हाउचरवर स्वाक्षरी आणून दिल्यानंतर त्याद्वारे त्यांच्या खात्यातील रक्कम मिळावी, अशी विनंती शाळेतील शिक्षकांनी केल्याचे संबंधित बँक व्यवस्थापकाकडे केलेल्या चौकशीत कौर यांना कळाले.पैसे दिल्याचा दावाविद्यार्थ्यांच्या बँक खात्यातील रक्कम वर्षभरापूर्वी काढली असली, तरी त्यांना साहित्य मिळाले नसल्याबाबत कौर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्र्यांकडे राज्य सरकारच्या वेबपोर्टलवर तक्रार केली आहे. २०१७-१८ मध्ये शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देण्यात आले आहे. त्यानंतर, ज्यांच्याकडून हे साहित्य खरेदी केले, त्यांना पैसे दिल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी जे.जे. तडवी यांनी सांगितले.
शिक्षकांनी लाटले विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्याचे पैसे?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2019 11:51 PM