- सुरेश लोखंडेठाणे : विदर्भाच्या नक्षलग्रस्त भागात राहून कष्टाने शिक्षण घेतलेल्या अण्णाजी दयाराम कुळसेंगे यांना ठाणे जिल्हा परिषदेत नऊ वर्षांपूर्वी शिक्षकाची नोकरी मिळाली. मात्र, तत्कालीन मिळालेल्या शिक्षक नियुक्ती आदेशावर अण्णाजीऐवजी ‘अंजली’ असे चुकीचे लिहिले गेले. नऊ वर्षांपासून अद्यापपर्यंतही नावातील दुरुस्ती करण्याचे सौजन्य शिक्षण विभागाने दाखवले नाही. प्रशासनाच्या या चुकीमुळे शिक्षकास नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याची बाब सदस्या वृषाली शेवळे यांनी उघडकीस आणली आहे.गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी तालुक्यातील सिसा येथील कुळसेंगेचे रहिवासी आहेत. अनुसूचित जमाती प्रवर्गातील या शिक्षकास २०१० मध्ये दहावी, बारावीच्या शिक्षणावर शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यानंतर, शिक्षक पात्रतेस आवश्यक असलेले ‘डीएड’ ही शिक्षणही पूर्ण केले. परंतु, तेव्हा तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेने दिलेल्या नियुक्त आदेशावर त्यांचे नाव अण्णाजीऐवजी अंजली असे नमूद केले. या चुकीच्या नावावर तलासरी पंचायत समितीच्या शिक्षण विभागानेही त्यांना हजर करून घेतले. त्यानंतर, नावात दुरुस्तीसाठी ते तब्बल नऊ वर्षांपासून ठाणे जि.प.च्या प्राथमिक शिक्षण विभागात फेऱ्या मारत आहेत. पालघर जिल्हा परिषदेच्या झरी धांगडपाडा, ता. तलासरी येथे ते कार्यरत आहेत.अंजलीऐवजी मी ‘अण्णाजी’ असल्याची सर्व कागदपत्रे त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द केली आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या मूळ गावच्या ग्रामपंचायतीनेही शिफारस केली आहे. मात्र, शालेय कागदपत्रे, डीएड प्रमाणपत्र आदी सर्व कागदपत्रे सुपूर्द करूनही नाव दुरुस्ती करून देण्यास शिक्षणाधिरी टाळाटाळ करीत आहेत.जि.प.विरोधात संतापगडचिरोलीच्या नक्षली भागातील हा शिक्षक आपल्याकडे स्वाभिमानाने जीवन जगत आहे. चुकी नसतानाही त्याचे नाव ‘अंजली’ असे नियुक्ती आदेशात नमूद केले आहे. त्यातच, प्रशासनही त्याची चोहोबाजूने अडवणूक करत आहे. प्रशासनाच्या चुकीमुळे व संतापातून या शिक्षकाचे बरेवाईट होऊ शकते. मनस्तापातून ते नक्षलग्रस्त होण्याची शक्यताही नाकारता येत नाही, आदी मुद्यांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चाही झाली आहे. मात्र, अजूनही कुळसेंगे यांच्या नियुक्ती आदेशातून चुकीची दुरुस्ती करून अण्णाजी असे करून मिळालेले नसल्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील मनमानी व अनागोदी कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे.
अण्णाजीऐवजी अंजली नावाने नियुक्ती आदेश, नावातील दुरुस्तीसाठी शिक्षकाचा नऊ वर्षे संघर्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 3:04 AM