- नितिन पंडीत
भिवंडी- भिवंडी मनपाच्या अखत्यारीत असलेल्या उर्दू प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनपा नगरसेवकांनी लेखी निवेदनाद्वारे केला होता . त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या स्थानी समितीच्या सभेत देखील या बदल्यांच्या प्रस्तावास स्थायी समितीने आक्षेप घेत उर्दू माध्यमांच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांच्या प्रस्तावास स्थगिती देत ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना पुन्हा भिवंडी मनपा शिक्षण विभागात घेण्यात यावे तसेच इतर बदल्यांचे प्रस्ताव रद्द करावे. भिवंडी मनपाच्या शिक्षण विभागात अगोदरच शिक्षकांची कमतरता असल्याने त्याउलट शिक्षकांच्या बदल्या होत असल्याने या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थायी समिती सदस्यांसह नगरसेवकांनी केला होता . यांनतर काही वृत्तपत्रांमध्ये त्यासंदर्भातील बातम्या देखील प्रकाशित झाल्या होत्या .
विशेष म्हणजे स्थायी समितीने शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रस्तावास विरोध करत त्यासंदर्भाती स्थगिती ठराव देखील स्थायी समितीत मंजूर करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मनपा आयुक्तांकडे केली होती . मात्र या बदली प्रकरणाने भिवंडी महापालिकेची प्रतिमा मलिन झाली असून नागरसेवकांकडे शिक्षक बदल्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यास तीन दिवसाच्या आत सादर करावे अन्यथा नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा वजा पत्र भिवंडी मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी भिवंडी मनपा नगरसेवक व स्थायी समितीचे सदस्य अरुण राऊत यांच्यासह इतरही नगरसेवकांना दिला आहे .
विशेष म्हणजे स्थायी समितीने बदल्यांचा ठराव रद्द केल्या नंतरही व त्यांना सगळे पुरावे दिल्या नंतरही मनपा आयुक्तांनी स्थायी समिती अथवा नगरसेवकाच्या आक्षेपांची चौकशी करणे गरजेचे आहे मात्र नगरसेवकांना कागदपत्र दाखवा अन्यथा कारवाई होईल अशी नोटीस बजावणे हे अत्यंत चुकीचे व दुर्दैव आहे , मग आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे त्या त्या बाबींचे पुरावे मनपा आयुक्ताकडे दिले आहेत मग त्यावर कारवाई का होत नाही. राहिला प्रश्न शिक्षक बदल्यांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा तर ते पुरावे देखील लेखी स्वरूपात मनपा आयुक्तांना दिले आहेत.
आता मनपा आयुक्त नेमकी काय कारवाई करतात याकडे आमचे लक्ष आहे अशी प्रतिक्रिया नगरसेवक अरुण राऊत यांनी दिली आहे. तर नगरसेवक हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी केलेल्या आरोपांमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे, त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते सादर करा त्यांनतर या प्रकरणाची सखोल चौकशी निश्चितच करण्यात येईल अशी प्रतिक्रिया मनपा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.