बदलापूर : जनगणना कामातून सुटका करण्यासाठी संगनमताने खोटी कागदपत्रे तयार करुन सरकारची फसवणूक केल्याबद्दल संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रुईदास गायकवाड यांनी केली आहे. या प्रकरणी पुरावे देखील सादर केले आहेत. शिक्षकांच्या या कामचुकारपणाला मुख्याध्यापकांनीही संरक्षण दिल्याचे उघड झाले आहे. बदलापूर हायस्कूलमधील शिक्षकाने जनगणनेच्या कामातून सुटका मिळविण्यासाठी आजारपणाचा खोटा अर्ज करुन सरकारची दिशाभूल केली आहे. शिक्षक एल.यू.धात्रक यांनी जनगणनेच्या कामातून सुटका मिळावी यासाठी आजारपणाचे कारण पुढे केले. आजारपणाचे कारण दिल्याने जनगणनेची जबाबदारी असलेल्या बदलापूर पालिकेच्यावतीने संबंधित शिक्षकांना नोटीसही बजावली होती. मात्र या नोटीसीला उत्तर देताना शाळेचे मुख्याध्यापक आर. एस. सोनवणे यांनीही संबंधित शिक्षकाच्या बाजूनेच अहवाल पालिकेकडे सादर केला. धात्रक हे आजारपणामुळे शाळेत येत नसल्याचे आणि ते रजेवर असल्याचे मुख्याध्यापकांनी पालिकेकडे खुलासा केला होता. जनगणनेच्या कामातून अंग काढणाऱ्या शिक्षकांचा हा प्रकार माहितीच्या अधिकारात उघड झाला आहे. ज्या काळात जनगणनेचे काम आणि प्रशिक्षण होते त्या काळात धात्रक हे आजारपणाच्या सुटीवर न जाता शाळेत नियमित कामावर हजर होते. ज्या काळात ते आजारपणामुळे गैरहजर होते असा अहवाल शाळेने पाठविला आहे त्या दरम्यान ते कामावर हजर होते. त्याचा पगार देखील त्यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)ं
जनगणनेतून सुटकेसाठी शिक्षकाची धडपड
By admin | Published: March 15, 2017 2:23 AM