ठाणे : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेबाबत शासनाने दुर्लक्षच केले आहे. त्याच्या निषेधार्थ ५ सप्टेंबरचा शिक्षक दिन जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक 'काळा दिवस' म्हणून पाळून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन छेडले.ठाणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली व त्यांच्या महासंघाच्या आदेशानुसार येथील विश्रामगृहाजवळ हे धरणे आंदोलन छेडले. या शिक्षकांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय चितळे, कार्यकारी सल्लागार प्रकाश माळी, खजिनदार सुनील भुसारा आदींचा समावेश होता. या आंदोलनासाठी केवळ पाच शिक्षकांना पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे जास्त शिक्षक उपस्थित करता आले नसल्याचे चितळे यांनी लोकमतला सांगितले.शनिवारी पार पडणाऱ्या या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक त्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आॅनलाइन लेक्चरच्या वेळी काळ्या फिती दंडावर लावून काळा दिवस म्हणून पाळणार आहेत.गेली अनेक वर्षे आंदोलन, चर्चा लेखी निवेदने देऊनसुद्धा शासनाने दुर्लक्षच केल्याचा आरोप या शिक्षकांकडून होत आहे. त्याच्या निषेधार्थ 'शिक्षक दिन' हा 'काळा दिवस' म्हणून पाळण्याचा इशारा त्यांनी या निवेदनाद्वारे दिला. दरम्यान, सरकारने तातडीने आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे....तर पुढच्या वर्षी ‘थॅक्स ए गव्हर्नमेंट डे’ पाळूशासनाने एका परिपत्रकानुसार 'थँक्स ए टीचर डे' म्हणून पाळण्याचे आवाहन केले आहे. त्यापेक्षा येणाºया वर्षात आम्हा शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या मान्य करून पुढच्या शिक्षकदिनी 'थँक्स ए गव्हर्नमेंट डे' असे पाळण्याची आम्हाला संधी द्यावी, असे चितळे यांनी सांगितले.या मागण्या मूल्यांकन पात्र वेतन अनुदान अघोषित यादीतील शिक्षकांनाही लागू करणे, दहा वर्षांहून अधिक काळ वाढीव पदावरील शिक्षकांनाही पद मंजुरी व वेतन अनुदान लागू करणे, आयटी विषयाच्या शिक्षकांनाही वेतनश्रेणीत वेतन देणे, जुनी पेन्शन योजना लागू करावी, १० ते ३० वर्षांच्या सेवेनंतर मिळणारी आश्वासित प्रगती योजना लागू करणे आदी मागण्यांसाठी या शिक्षकांकडून शिक्षक दिन हा काळा दिवस म्हणून पाळला जाणार आहे.
शिक्षक 'काळा दिवस' म्हणून पाळणार, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 1:57 AM