भाईंदर- मीरा भाईंदर महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा व सोयी- सुविधाचा आढावा घेऊन तो उंचावण्यासाठी आयुक्त यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे ५ गट तयार केले आहेत . त्या अधिकाऱ्यांच्या पथकांनी शाळांना भेटी देऊन ४१ मुद्द्यांचा आढावा घेण्यास व त्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यास सुरवात केली आहे.
महापालिकेच्या मराठी, हिंदी, गुजराती, ऊर्दू व सेमी इंग्रजी अश्या ३६ शाळा आहेत. त्यात ८ हजार २५ इतके विद्यार्थी शिकत आहेत. मुळात खाजगी शाळां मधील शिक्षकांच्या तुलनेत पालिकेच्या शिक्षकांना गलेलठ्ठ पगार मिळत असताना शिक्षणाचा दर्जा मात्र सुमार आहे . महापालिका शाळांवर करोडोंचा खर्च करते . पण सुविधा नाहीत व शिक्षणाचा दर्जा उंचावला जात नसल्याने लोकं पालिका शाळां कडे पाठ फिरवतात . त्यामुळे शिक्षकांच्या कामांचा सुद्धा लेखाजोखा तयार करून त्यांच्यावर आवश्यकते नुसार कार्यवाहीची गरज व्यक्त होत होती.
दरम्यान महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणात्मक शिक्षण मिळावे, शाळां मध्ये स्वच्छता - सोयी सुविधांचा दर्जा वाढवा ह्यावर आयुक्त दिलीप ढोले यांनी लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या वर्षी आयुक्तांनी पालिका शिष्टमंडळास दिल्ली सरकारच्या शाळांची पाहणी करण्यासाठी पाठवले होते . त्या पाहणी नुसार शिष्टमंडळाने अहवाल सादर केला होता . आयुक्तांनी शाळां मध्ये डिजिटल वर्ग तयार करून त्याची सुरवात केली आहे . तसेच मुख्याध्यापक - शिक्षकांच्या बैठका घेऊन आढावा घेणे , शिक्षकांना मार्गदर्शनपर प्रशिक्षण देणे , शाळांना भेटी देणे , अभ्यासपर भिंती रंगवणे आदी उपक्रम आयुक्तांनी चालवले आहेत.
आता आयुक्तांनी प्रत्येक शाळा निहाय शैक्षणिक दर्जा , स्वच्छता , सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गट तयार केले आहेत . उपायुक्त, शिक्षणाधिकारी, सहायक आयुक्त , लेखाधिकारी , उद्यान अधीक्षक , प्रभाग अधिकारी, आरोग्य अधिकारी, सिस्टीम मॅनेजर, समाज विकास अधिकारी , केंद्र प्रमुख अश्यांचा समावेश ह्या गटां मध्ये करण्यात आला आहे . प्रत्येक गटात ७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
गट क्र . २ मध्ये ८ शाळा असून उर्वरित चार गटां मध्ये प्रत्येकी ७ शाळांचा समावेश करण्यात आला आहे . सदर अधिकाऱ्यांच्या गटाने त्यांना जबाबदारी दिलेल्या शाळांची पाहणी करून तेथील स्वच्छता , व्यवस्था, रंगरंगोटी, इमारतीची स्थिती, पिण्याचे पाणी, अग्निशमन व्यवस्था, सीसी टीव्ही, स्वच्छतागृहांची स्वच्छता, शिक्षकांची उपस्थिती, मुलांकडे असलेली पुस्तके, वह्या व गणवेश, सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, शिक्षणाचा दर्जा आदी ४१ मुद्द्यांचा आढावा घ्यायचा आहे . त्याची छायाचित्रे काढून घ्यायची आहेत . त्याचा सविस्तर अहवाल महापालिका आयुक्तांना द्यायचा आहे.
सदर गटांनी पहिल्या फेरीतील अहवाल आयुक्तांना सादर केले असून आयुक्तांनी त्या बाबत बैठक घेऊन आढळून आलेल्या त्रुटी दूर करणे व उपाययोजना यांची पूर्तता करण्यास संबंधित विभागांना सांगितले आहे . पुढील भेटीदरम्यान अधिकाऱ्यांच्या गटाने आयुक्तांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी झाली आहे का, याची खात्री करून त्याचा सुद्धा अहवाल द्यायचा आहे.