लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: डोंबिवली येथील नवनीत नगर, देसलेपाडा येथील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या भेडसावत होती. पाण्याचा हा प्रश्न ऐन कोरोनासारख्या संकटाच्या काळात मार्गी लागल्यामुळे येथील रहिवाशांनी ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिदे आणि कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.कच्छी जैन समाज हा नेहमीच तळागाळातील गरिबांना मदरतीचा हात पुढे करीत असतो. आपल्या उत्पन्नातील काही भाग हा गरजूंसाठी खर्च करावा, अशी शिकवण हा समाज देत असतो. कच्छी जैन फाऊंडेशनच्या वतीने डोंबिवलीतील नवनीतनगर, देसलेपाडा येथे गरीब तसेच मध्यमवर्गीय हजार कुटुंबांना मोफत तर काहीना काहींना दहा टक्के रकमेमध्ये निवासी घरे दिली आहेत. जवळपास हजार कुटुंब असलेल्या या रहिवाशांना गेल्या सात ते आठ वर्षांपासून पाणी समस्येला तोंड द्यावे लागत होते. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक वर्षांपासून टँकरद्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आली होती. कच्छी जैन फाऊंडेशनचे पियुष शहा आणि दीपक भेदा यांनी येथील पाणी समस्येसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे यासाठी पाठपुरावा केला. खासदार शिंदे हे डोंबिवली येथील नवनीतनगर येथे एका कार्यक्र मासाठी काही दिवसांपूर्वी आले असता, त्यांनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेतली. तेंव्हा लवकरच येथील पाणी समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढू, असे आश्वासनही त्यांनी दिले होते.कोरोनासारख्या संकटाच्या काळात अनेक परप्रांंतीय मजूर आपल्या गावी गेले. त्यामुळे मजूरांचीही सध्या वाणवा आहे. मजूर नसतांनाही खासदार शिंदे यांनी नवनीतनगरच्या रहिवाशांना दिलेला शब्द पाळला. त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे आणि महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांना हा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेऊन येथील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सूचना केल्या. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नुकताच हा प्रश्न सोडविला. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राजीव पाठक आणि उपअभियंता पाणी पुरवठा (२७ गाव) विजय पाटील यांनी एमआयडीसीतील जलकुंभातून तीन इंची जलवाहिनी जोडण्याचे काम ६ जून रोजी केल्यामुळे या भागातील पाणी प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.*पाणी जोडणीमुळे नवनीत नगर, देसले पाडा येथील जवळपास पाच हजार नागरिकांच्या घरात पाणी उपलब्ध झाले आहे. पाणी प्रश्न सुटल्यामुळे अनेक वर्षांनी नळाला पाणी आल्याचे पाहून नागरिकांच्या डोळयात अक्षरश: आनंदाश्रू पहायला मिळाले. नागरिकांनी खासदार श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि कच्छी जैन फाऊंडेशनचे आभार मानल्याचे पियुष शहा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.