कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण रेल्वेस्थानक परिसराच्या विकासकामास सुरुवात झाली आहे. त्यामुळे या परिसरातील पार्किंगची पर्यायी व्यवस्था कुठे व कशा प्रकारे करता येईल, यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी शुक्रवारी सकाळी स्टेशन परिसराचा पाहणी दौरा केला. यावेळी तहसील कार्यालय आणि पोलीस लाइनची पाहणी करून तेथे पार्किंग सुरू करता येऊ शकते, या दृष्टीने चाचपणी करण्यात आली.
महापालिका आयुक्तांनी चार दिवसांपूर्वी शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिका मुख्यालयात बैठक घेतली होती. त्यानंतर रेल्वेस्थानक परिसराची पाहणी केली जाईल, असे म्हटले होते. त्यांच्या आदेशानुसार पवार यांनी ही पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत उपायुक्त पल्लवी भागवत, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, अभियंता सुभाष पाटील, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी सुखदेव पाटील उपस्थित होते.
स्थानक परिसरातील महापालिकेचा कपोते वाहनतळ हा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नव्याने विकसित करण्यात येणार आहे. या वाहनतळात एक हजार १०० वाहने उभी केली जात होती. त्या दृष्टीने पर्यायी वाहन पार्किंगची व्यवस्था स्थानक परिसराचे विकासकाम सुरू असताना कुठे करता येईल, याची पाहणी केली गेली.
स्थानक परिसरातील तहसील कार्यालयाच्या जागेत वाहने उभी करता येऊ शकतात. त्याचबरोबर पोलीस लाइनच्या वसाहतीतही पर्यायी पार्किंगची व्यवस्था करता येऊ शकते. या दोन्ही ठिकाणची पाहणी यावेळी करण्यात आली. स्थानक परिसरात पोलिसांची एक ते दीड हजार वाहने उभी केली जातात. त्यांच्यासाठी एक विशेष पार्किंगची व्यवस्था कशा प्रकारे केली जाऊ शकते.
फेरीवाल्यांचे स्थलांतर
- कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांना पर्यायी व्यवस्था करून त्यांचे स्थलांतर तेथे करता येऊ शकते.
- शेअर रिक्षाचालक भाडे भरण्यासाठी स्थानक परिसरात गर्दी करतात. त्यामुळे वाहतूककोंडी होते. त्याऐवजी एकच ठिकाणी मीटर पद्धतीने रिक्षा सुरू करता येतील का, याची चाचपणी या पाहणी दौऱ्याच्या निमित्ताने पवार यांनी घेतली.
-------------------------