ठाणे : नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील कॉलेजमधून आर्किटेक्चर (वास्तुविशारद) ची पदवी घेऊन आॅस्ट्रेलियातील बेंडीगो या शहरात ठाणे येथील लुईसवाडीचा मुळचा रहिवाशी तेजस देशमुख उच्च शिक्षण घेत आहे. त्याला ‘ला ट्रोब विद्यापीठा’ने ‘इंटरनॅशनल स्टूडंट आॅफ द ईयर - रीजनल’ हा पुरस्कार देऊन सन्मानीत केले. त्यांच्या या यशाबद्द त्यांचे वडील विकास देशमुख यांचे ठाणे शहरातील नागरिकांसह नातेवाईकांकडून रोजदार अभिनंदन होत आहे. आॅस्ट्रेलियाच्या बेंडिगो शहरातील ‘ला ट्रोब विद्यापीठ’मध्ये तेजसला हा ‘इंटरनॅशनल स्टूडंट आॅफ द ईयर - रीजनल २०१८’ चा शिक्षण पुरस्कार २५ सप्टेंबर रोजी प्राप्त झाला. आॅस्ट्रेलियातील डेकिन एज, फेडरेशन स्क्वेअर, मेलबर्न येथे हा पुरस्कार वितरणसमारंभात पार पडला. यावेळी व्यापार आणि गुंतवणूक मंत्री फिलिप दलिदाकीस यांच्या शुभहस्ते तेजसला हा शिक्षण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. या विद्यापीठात तेजस ‘समाज नियोजन आणि विकास’ या विषयावर मास्टर्सची पद्वीप्राप्त करीत असल्याचे तेजसचे वडील विकास देशमुख यांनी लोकमतला सांगितले.आॅस्ट्रेलियाच्या या विद्यापीठात प्रत्येक वर्षी सुमारे १७० देशांतील दोन लाख आंतरराष्ट्रीय विद्यार्थी व्हिक्टोरिया शिक्षणासाठी येतात. या व्हिक्टोरियन शिक्षणात भारत दुसऱ्या क्र मांकावर आहे. व्हिक्टोरियन इंटरनॅशनल एज्युकेशन अवॉर्ड २०१८ प्राप्त करणारा ठाणे शहरातील तेजस हा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये एकमेव भारतीय विद्यार्थी ठरला असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्याच्या प्रचंड प्रयत्नांमुळे आणि उत्साहानंतर तेजसला सुमारे ४०० प्रतिनिधींच्या उपस्थितीत शैक्षणिक क्षेत्रातील या मानाच्या पुरस्काराचा विजेते घोषित केला. याशिवाय त्याला आॅस्ट्रेलिया सरकारच्या शिक्षण विभागाकडून दहा हजार डॉलरचे बक्षीस देखील देऊन सन्मानीत केल्याचे सुतोवाच देशमुख यांनी केले.या सन्मानाविषयी वडील म्हणून विकास देशमुख यांचे मत जाणून घेतले असता ते म्हणाले की ‘ खास करून तेजसचे बालपण तसेच शिक्षण ठाण्यातच झाल्यामुळे तो पूर्णपणे ठाणेकर आहे. त्याच्या या यशामुळे सर्व कुटुंबीय आनंदात असून भारावून गेलो आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे. आॅस्ट्रेलियातील त्याचे उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने भारतात येऊन त्याच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा फायदा आपल्या देशाच्या विकाससाठी करावा’ अशी इच्छा देशमुख यांनी वडील या नात्याने लोकमतकडे व्यक्त केली आहे.