ठाणे : खास महिला प्रवाशांसाठी धावणाऱ्या तेजस्विनी बसचा शुभारंभ जूनअखेरपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सुविधा प्रत्यक्षात कार्यान्वित होण्यास उशीर लागणार आहे.
महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यादृष्टीने परिवहनसेवेच्या ताफ्यात ५० तेजस्विनी बस घेण्याचा निर्णय झाला होता. या बससाठी प्रशिक्षित महिला चालक-वाहक आणि महिला तिकीट तपासनीसचीही नेमणूक करण्यात येणार आहे. या बस ठेकेदारामार्फत चालवण्यात येणार आहेत. त्यावर चालक, वाहक नेमण्याची प्रक्रि या ठेकेदारच करणार आहे. तसेच, बसच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारीही ठेकेदाराची असणार आहे.
महिलांसाठी स्वतंत्र बस उपलब्ध व्हावी व त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या हेतूने राज्य शासनाने तेजस्विनी बस सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना ३०० बस मिळणार आहेत. त्यापैकी ५० बस ठाणे शहराच्या वाट्याला येणार आहेत. या प्रस्तावास परिवहन समिती, ठामपाच्या महासभेनेही यापूर्वीच मान्यता दिली आहे. या बस मार्चच्या शेवटच्या आठवड्यात परिवहनसेवेच्या ताफ्यात येणार होत्या. पण, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने त्याचे उद्घाटन होऊ शकले नाही. आचारसंहिता संपल्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात या बस ठाण्याच्या रस्त्यावर धावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.