लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वाचनाची आवड असूनही परिस्थीतीअभावी पुस्तक खरेदी न करु शकणाऱ्या आदीवासी पाड्यातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शैक्षणिक पहाट आणण्याचा उपक्रम झेप प्रतिष्ठानने हाती घेतला आहे. मोबाईल नेटवर्क न पोहोचलेल्या गावांत पुस्तकांच्या माध्यमातून जगाशी संपर्क यावा यासाठी अवांतर वाचनाची पुस्तके देऊन झेप आदीवासीपाड्यांत ‘तेजोमय’ दिवाळी साजरी करणार आहे.
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आजकालची पिढी पुस्तकांपासून दूर झाली आहे. एकीकडे शहरी भागात ही परिस्थीती तर दुसरीकडे ग्रामीण भागांत विशेषतः आदिवासीपाड्यांवर वाचनाची आवड असूनही पुस्तकांच्या नावाने दुष्काळच आहे. बेताच्या परिस्थीतीमुळे जेमतेम शिक्षण घेता येते. शालेय पुस्तकांखेरीज अवांतर वाचनाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढणे गरजेचे असताना पुस्तकांच्या वाढलेल्या भरमसाट किमती ही पुस्तके न घेण्याचे एक कारण आहे. मोबाईल फोन नसल्यामुळे जगाशी संपर्क नाही. त्यामुळे अशा मुलांमधील वाचनाच्या आवडीला प्रोत्साहन मिळावे, मान्यवरांची पुस्तके वाचून त्यांचा आजूबाजूच्या जगाशी संपर्क जोडला जावा, या उदात्त हेतूने झेप प्रतिष्ठानने दिवाळीच्या निमित्ताने ‘तेजोमय’ हा उपक्रम हाती घेतला.
गेल्यावर्षीपासून हा उपक्रम सुरू केला. शैक्षणिक पुस्तके या विद्यार्थ्यांना मिळतात. परंतू अवांतर वाचनाची पुस्तके दिल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडेल आणि तेथे वाचन चळवळीला चालना मिळेल, असे झेपचे संस्थापक अध्यक्ष विकास धनवडे यांनी सांगितले. झेप प्रतिष्ठानतर्फे यावर्षीदेखील पुस्तकदान हा उपक्रम राबवला जात आहे. ज्या अंतर्गत आदिवासीपाड्यातील तसेच, शहरी भागातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना इंग्रजी आणि मराठी भाषेतील पुस्तके ग्रंथालयासाठी उपलब्ध करून दिली जातात. गेल्यावर्षी जवळपास ५०० पेक्षाही जास्त पुस्तके जव्हारच्या आदिवासीपाड्यांत वाटप केली होती, जिथे शिक्षक मुलांकडून ही पुस्तके वाचून घेतात. या पुस्तकदान उपक्रमांतर्गत आपल्याकडे असलेली जुनी पुस्तके रद्दीला न देता झेप प्रतिष्ठानकडे द्यावीत. ही पुस्तके अशा मुलांसाठी उपलब्ध करून दिली जातील असे आवाहन धनवडे यांनी केले.
या पुस्तकात ग्रंथ, पोथी, कॉलेज, इंजिनिअरिंग अशी पुस्तके देऊ नयेत. मराठी तसेच इंग्रजी भाषेतील पुस्तके, शब्दकोश, आत्मचरित्रे, शौर्यकथा, व्यवसाय संबंधित गोष्टी, प्रवास वर्णने अशा प्रकारची पुस्तके देता येतील. त्यासाठी इच्छुकांनी ९७००७१२०२० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन झेपने केले आहे.