सांगा निवडणुकांना कसे सामोरे जायचे? काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमोर प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 04:05 AM2019-02-04T04:05:58+5:302019-02-04T04:06:22+5:30
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यात्रा, सभांद्वारे कें द्र आणि राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या कारभाराविरोधात रान पेटवायला प्रारंभ केला आहे. परंतु, स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांतील अंतर्गत कलह आणि वर्चस्ववाद, संघर्ष हा काही केल्या कमी होण्याची चिन्हे नाहीत.
- प्रशांम माने, कल्याण
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यात्रा, सभांद्वारे कें द्र आणि राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारच्या कारभाराविरोधात रान पेटवायला प्रारंभ केला आहे. परंतु, स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षांतील अंतर्गत कलह आणि वर्चस्ववाद, संघर्ष हा काही केल्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे निवडणुकांना सामोरे जायचे कसे?
असा यक्षप्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मार्चच्या पहिल्या आठवड्यात लागण्याचे संकेत आहेत. मध्य प्रदेशसह अन्य दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या झालेल्या पराभवामुळे मोदीलाट ओसरल्याची प्रचीती आली आहे. विरोधी पक्षांनी त्याचा फायदा उठवायला सुरुवात केली आहे. काँग्रेसने जनसंघर्षयात्रा तर, राष्ट्रवादीने परिवर्तन संकल्पयात्रा काढून महागाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आरक्षण असो अथवा राफेल विमानखरेदी घोटाळा प्रकरण या मुद्द्यांवर हल्लाबोल चढवला आहे. एकीकडे या यात्रा व सभांमधून नेते मंडळी महाराष्ट्र पिंजून काढत नागरिकांमध्ये सरकारविरोधी वातावरण निर्माण करत असताना स्थानिक पातळीवर मात्र पक्षांमधील अंतर्गत वाद, गटबाजी, संघर्ष वरिष्ठ नेत्यांसाठी एक प्रकारे डोकेदुखी ठरत आहे. त्याची प्रचीती कल्याणमध्ये नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमधून आली आहे.
पक्षांतर्गत स्थानिक आजी-माजी पदाधिकाºयांकडून मिळत नसलेल्या सहकार्यामुळे व्यथित झालेले राष्ट्रवादीचे कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांनी पदाचा राजीनामा थेट प्रदेशाध्यक्षांना सादर करून खळबळ उडवून दिली होती. कल्याण पूर्वेत झालेल्या परिवर्तन सभेत अपेक्षित गर्दी जमवू शकलो नाही, हे प्रमुख कारण त्यांनी राजीनामापत्रात दिले होते. परंतु, पक्षातील प्रस्थापित स्थानिक धनदांडग्यांकडून त्रास होत असल्याचेही हनुमंते यांनी म्हटले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे पक्षांतर्गत विरोधकांमध्ये ‘अच्छे दिन’ आल्याची भावना निर्माण झाली खरी, परंतु राजीनाम्याची दखल थेट पक्षाचे सर्वेसर्वा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी घेत तो नामंजूर केला. त्यामुळे जिल्हाध्यक्ष बदलला जाईल, या विरोधकांच्या आशेवर पाणी फिरले. पक्षातील प्रत्येक हालचालींवर माझे लक्ष आहे, हे देखील पवारांनी कृतीतून दाखवून दिल्याचे बोलले जात आहे.
सभेला गर्दी जमवू शकलो नाही, हे कारण राजीनाम्यात हनुमंते यांनी दिले असले तरी गर्दी जमवण्याची जबाबदारी त्यांची एकट्याची होती का? अन्य स्थानिक नेत्यांची नव्हती का, असेही सवाल उपस्थित होत आहेत. पूर्वेतील चक्कीनाका परिसरात ही सभा झाली. मात्र, ऐनवेळी सभा बदलण्याचा ठाणे जिल्हा प्रभारी गणेश नाईक यांनी दिलेला आदेश हा देखील शंका उपस्थित करणारा ठरला आहे. पवार यांनी राजीनामा नामंजूर केला असला, तरी स्थानिक पातळीवरील गटबाजी, श्रेयवाद, संघर्षाची परिस्थिती बदलेल का? हा देखील संशोधनाचा विषय आहे. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यात पवार कल्याण-डोंबिवलीच्या दौºयावर येत आहेत. त्यावेळी तरी अंतर्गत नाराजी दूर करण्यात त्यांना यश येतेय का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
राष्ट्रवादीतील राजीनामा प्रकरण ताजे असतानाच काँग्रेसमध्येही ‘आलबेल’ नसल्याचे जनसंघर्षयात्रेच्या निमित्ताने पाहायला मिळाले. कल्याणमध्ये प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, प्रवक्ते सचिन सावंत यांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. मात्र, ते सभेच्या ठिकाणी येण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील प्रकाश मुथा आणि संजय दत्त गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी बॅनरबाजीवरून एकमेकांना भिडले होते. सभेच्या व्यासपीठावर लावलेल्या बॅनरवर युवक काँगे्रसच्या नेत्यांचे फोटो नसल्याने वाद निर्माण झाला होता. त्यात बदललेल्या बॅनरवरून दत्त आणि मुथा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते चक्क हातघाईवर आले होते. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा तणाव टळला. मात्र, त्याची दखल घेऊन प्रदेश कार्यालयाने पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी आणि प्रदेश सचिव प्रकाश मुथा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
एकीकडे भाजपा आणि शिवसेनेच्या सरकारविरोधात नेत्यांचा संघर्ष सुरू असताना पक्षातील स्थानिक पातळीवरील अंतर्गत ‘कलह’ हा अशोभनीय असा होता. प्रदेश नेत्यांनी स्थानिक नेते आणि पदाधिकाºयांना नोटीस बजावून खुलासा मागितला असला, तरी या झालेल्या तमाशाने स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
मनसे आणि त्यानंतर भाजपा असा प्रवास करून स्वगृही काँग्रेसमध्ये परतलेले स्थानिक ज्येष्ठ नेते, माजी आमदार रमेश पाटील यांचा पक्षप्रवेश जनसंघर्ष यात्रेनिमित्ताने पार पडलेल्या सभेत चव्हाणांच्या उपस्थितीत झाला. परंतु, त्यांच्या पुनरागमनापेक्षा तेथे गटबाजीतून झालेली ‘राडेबाजी’ चांगलीच गाजली. मुथा आणि दत्त गट हे भिडल्याचे दिसले तरी अशोक चव्हाण आणि संजय दत्त यांच्यात असलेला ‘विसंवाद’ हा देखील या गोंधळाला कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. एरव्ही आंदोलने, रॅली यातून दिसणारी गटबाजी आता थेट सभांमधून चव्हाट्यावर येऊ लागली आहे. ही चिंतेची बाब असून नुकत्याच कल्याणमध्ये झालेल्या पक्षाच्या प्रशिक्षण शिबिरातून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काय बोध घेतला, असा सवाल आहे. स्थानिक पातळीवरील हा कलह पाहता पदाधिकाºयांची उचलबांगडीही होण्याचे संकेत मिळत आहेत.
पक्षात बंडखोरांना रेडकार्पेट, तर निष्ठावंतांची गळचेपी पक्षात सुरू असून श्रेयवादाला प्रदेश नेत्यांकडूनच खतपाणी घातले जात असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्षासाठी मारक ठरणाºया या स्थितीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. पक्षात एकजुटीने भाजपा-शिवसेनेच्या विरोधात उभे ठाकले पाहिजे, अन्यथा येणाºया निवडणुकांच्या निकालांमध्ये याचे गंभीर परिणाम दिसून येतील, अशी शंकाही उपस्थित होत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीला धोक्याची घंटा
वंचित बहुजन आघाडीची सभाही नुकतीच कल्याणमध्ये झाली. शिवसेना-भाजपाच्या बालेकिल्ल्यात सभेला झालेली गर्दी युतीचा रक्तदाब वाढवणारी ठरली आहे. असे असले तरी त्यात जास्त नुकसान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.
दलित आणि मुस्लिम हा मतदारवर्ग बºयाचदा काँग्रेसला झुकते माप देतो. परंतु, वंचित आघाडीच्या सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हा मतदारवर्ग त्यांच्याकडे आकर्षित होऊ शकतो, ही काँग्रेससह राष्ट्रवादीला धोक्याची घंटा ठरू शकते, असे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही.