ठाणे : आम्ही खरेदी केलेली चाळीतील खोली बेकायदा आहे, याची आम्हाला कल्पना होती. मात्र, आमच्या नगरसेवकाने ती कधीच तुटणार नाही, असे सांगितले होते. ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी आमच्याकडून पैसे घेऊन आम्हाला पाण्याची लाइन दिली, तर महावितरणच्या अधिकाºयांचे खिसे गरम केल्यावर त्यांनी आम्हाला विजेचे कनेक्शन दिले. जर आमची घरे तोडताय, तर आमची फसवणूक करणाºया भूमाफियांवर तुम्ही काय कारवाई करणार, आमच्याकडून पैसे घेऊन पाणी व वीजकनेक्शन देणाºया अधिकाºयांवर काय कारवाई करणार, असा संतप्त सवाल कारवाईत घर तुटलेल्या कोकणातील एका रहिवाशाने केला. असाच सूर उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा येथून दिव्यात राहायला आलेल्या अन्य रहिवाशांनीही लावला.दिव्यातील साबेगाव येथील साळवीनगरातील कांदळवनाच्या सरकारी जागेवरील ३९ चाळींवर जिल्हा प्रशासनाने सोमवारी धडक कारवाई केली. येथील चाळींमध्ये कोकणातील काही कुटुंबांसमवेत बहुतांशी उत्तर प्रदेश, बिहार, ओरिसा राज्यांतील असलेल्या हजारो रहिवाशांचे संसार उघड्यावर आले. अनेकांनी आपली गावाकडची जमीन विकून किंवा अंगावरील सोन्याचे दागिने विकून अडीच ते तीन लाख रुपयांत १० वर्षांपूर्वी ही घरे घेतली होती. या घरांचे नोटरी रजिस्ट्रेशन केलेली कागदपत्रेही रहिवासी कारवाई करणाºया अधिकाºयांना दाखवत होते. अधिकाºयांशी कारवाई रोखण्याकरिता हुज्जत घालत होते.पहिल्या चाळीतील दोन गाळ्यांवर पोकलेन मशीनने कारवाई सुरू होताच काही महिला धाय मोकलून रडू लागल्या. त्यांच्या कडेवर लहान पोरं होती. काहींच्या घरातील कर्ते पुरुष सकाळीच कामावर निघून गेले होते. घरातील सामानसुमान काढून घेण्याची संधीदेखील काहींना मिळाली नाही. पोलीस व अधिकारी विनंतीला धूप घालत नाहीत, हे पाहिल्यावर जमलेल्या काही तरुणांनी किरकोळ दगडफेक केली. मात्र, पोलिसांनी सौम्य लाठीमार करताच त्या तरुणांनी सुबाल्या केला. मग, काही पोलिसांनी आक्रमक झालेल्या महिला व पुरुषांना घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई होत आहे. हस्तक्षेप करू नका. तुमचे जे म्हणणे आहे ते जिल्हाधिकाºयांना भेटून सांगा. मात्र, लोक त्यांच्या मुद्द्यावर ठाम होते. कांदळवनाच्या जागेवर घरे बांधत असताना पोलिसांनी किंवा जिल्हा प्रशासनाने त्यांना का विरोध केला नाही. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयाने डोळ्यांवर कातडं का ओढून घेतले होते.
पैसे खाऊन पाणी, वीज देणाऱ्यांवर काय कारवाई करणार ते सांगा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 12:12 AM