राज्यात महाआघाडी साथ-साथ; जिल्ह्यात शिवसेना-काँग्रेसची पाठीला पाठ !
सुरेश लोखंडे
लोकमत न्यूज नेटवर्क...
ठाणे : जिल्ह्यातील सहा महापालिका, एक जिल्हा परिषद, दोन नगरपरिषदा, पाच पंचायत समित्या आणि दोन नगरपंचायतींमध्ये सध्यस्थितीला सत्ताधारी शिवसेनेचा वरचष्मा आहे; मात्र जिल्ह्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विरोधी पक्ष न ठेवण्याचे धोरण शिवसेनेने अवलंबले आहे. त्यामुळे बहुमत असूनही शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषदेत राज्यातील बलाढ्य भाजप या विरोधी पक्षाला सत्तेत सहभागी केले आहे. या सत्तेतील प्रथम क्रमांकांचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप सदस्य मात्र जि.प.च्या सर्वसाधारण सभेत सेनेच्या सत्ताधाऱ्यांवर तुटून पडतात. अधिकाऱ्यांकडून सदस्यांचेही काम होत नसल्याची तक्रार या जिल्हा परिषदेसह महापालिका, पंचायत समित्या या सर्व ठिकाणच्या मित्र पक्षांनी शिवसेना विरोधात तक्रारी आहेत.
* ठाणे जि.प.
ठाणे जिल्हा परिषदेत ५३ सदस्य कार्यरत आहेत. यापैकी शिवसेनेचे २६ सदस्य असून मित्र पक्ष भाजपचे १६, राष्ट्रवादीचे ११ आणि काँग्रेसच्या एक महिला सदस्य आहेत. या सत्तेसाठी शिवसेनेला एक किंवा दोन सदस्य अपेक्षित होते. यासाठी राष्ट्रवादीला सोबत घेतलेले असतानाही भाजपला सोबत घेतले. काम वाटपावरून आणि शाळांच्या वर्गखोल्या मंजुरीसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची प्रतिनियुक्ती, बदल्यांच्या विषयांवर या मित्र पक्षांमध्ये धुसफुस सुरू आहे. याशिवाय शिवसेनेचे माजी बांधकाम सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याप्रमाणेच अन्यही पक्षांकडून कार्यकर्ते हेरून त्यांना प्रवेश दिला जात आहे.
* ठाणे मनपा-
राज्यातील सत्तेप्रमाणे ठाणे महापालिकेतही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आहे. तरी ही राष्ट्रवादीने दोनवेळा आंदोलन केले. परवा स्टॅंडिंगमध्येसुद्धा राष्ट्रवादीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठवला. अर्थसंकल्प मंजूर होत नाही म्हणून राष्ट्रवादीने शिवसेनेवर तोंडसुख घेतले. याशिवाय काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीने आंदोलन करून लसीकरणाच्या मुद्यासह मूलभूत सोयीसुविधांच्या समस्येला वाचा फोडली. राष्ट्रवादीचा एक गट सत्ताधारी शिवसेनेच्या बाजूने दिसून येत आहे; मात्र इतर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहेत. ठाणे महापालिका आयुक्त, सत्ताधारी शिवसेनेचे एजंट असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने काही दिवसांपूर्वी केला. एकूणच शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वारंवार खटके उडताना दिसत आहेत. अनधिकृत बांधकामांच्या मुद्यांवरून देखील काँग्रेसने शिवसेनेवर तोफ डागली. या महापालिकेत पक्षीय बलाबलमध्ये शिवसेनेचे ६७ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादीचे ३५,भाजपाचे २३, काँग्रेसचे तीन आणि एमआयएमचे दोन नगरसेवक आहेत.
------