दारूची दुकाने, बार उघडले पण मंदिर बंदच
उघड दार देवा आता : भक्तांची याचना
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : राज्यात अनलॉक झाले असले तरी धार्मिक स्थळे अद्याप बंद असल्याने भोळेभाबडे भक्त देवदर्शनाकरिता आतुर झाले आहेत. राज्य शासनाच्या नियमानुसार देऊळ बंद असल्याने विचित्र कोंडी झाली असून बंद दरवाजातूनच तो ईश्वराकडे कोरोनाचे संकट दूर होवो आणि दर्शन मिळो, अशी याचना करीत आहे.
आबालवृद्ध देवदर्शनासाठी आसुसलेले असून आता दर्शन द्या, असे साकडे घालत आहेत. राज्याची सांस्कृतिक उपराजधानी असलेल्या डोंबिवली नगरीतही विविध देवदेवतांचे उपासक मंदिर उघडण्याची वाट पाहत आहेत. येथील श्री गणेश मंदिर संस्थान, श्री स्वामी समर्थ मठ, नांदीवली, रामनगरमधील श्री गोविंदानंद श्रीराम मंदिर, पांडुरंग वाडीतील ग्रामदेवतेचे मंदिर, पश्चिमेकडे असलेले हनुमान मंदिर, गावदेवी माता, तसेच आयप्पा मंदिर, बालाजी मंदिर, कार्तिक स्वामी मंदिर आदी सर्व ठिकाणी भक्त मंदिरांच्या प्रवेशद्वारात येऊन माथा टेकून जात आहेत. तसेच कधी देवाचे द्वार उघडणार, अशी विचारणा करीत आहेत.
------------------------------
प्रतिक्रिया
किती दिवस कळसाचेच दर्शन?
दुसरी गुरुपौर्णिमा जवळ आली पण यंदाही मंदिरात जाऊन देवाचे दर्शन मिळेल याची शाश्वती नाही. राज्यात दारूची दुकाने उघडली पण मंदिराचे दरवाजे बंद आहेत, याहून दुसरी शोकांतिका नाही. आता देवानेच काहीतरी चमत्कार करावा आणि कोरोना नाहीसा करावा आणि मंदिराचे दरवाजे भक्तांसाठी खुले करावेत.
- एक पुरुष भक्त
-----------------
संकट आले की देवाला सांगायचे आणि मन मोकळं करायचे, असे आपले पूर्वज सांगायचे, पण आता दीड वर्ष झाले कोरोना संकट आलेय, तेव्हापासून देऊळ बंद आहे. वर्ष झाले, केवळ कळस दर्शन घेऊन समाधान मानावे लागत आहे, आता राहवत नाही. रामरायाचे दर्शन हवेच. शासनाने निर्णय घ्यावा.
- एक महिला भक्त
-----------
भक्त मंदिरात भक्तिभावाने येतात, मंदिरात जाताना रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून ते हार, फुले, प्रसाद नेतात. त्यामुळे गणेश मंदिराबाहेर, राम मंदिराच्या गेटवर हार फुलांची विक्री करून काहींची कुटुंबे चालतात, वडिलोपार्जित तोच व्यवसाय आहे. पण आता देऊळ बंद असल्याने आर्थिक कोंडी झाली असून संसार कसा चालवायचा, अशी वेळ आली, मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय.
- एक त्रस्त हार, फूल, प्रसाद विक्रेता
------------
मंदिर बंद असल्याने त्यावर आधारित असलेले जोड व्यवसाय ठप्प झाले. उदबत्ती, नारळ, तोरण विक्रेते तसेच पूजा साहित्य विक्री करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ते कोण भरून देणार? आर्थिक संकटात असलेल्या अनेक घटकांना तुटपुंजी का होईना मदत मिळाली, पण मंदिराबाहेर किंवा त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांना कोण तारणार? त्यांच्या कुटुंबीयांचे काय? आता सगळे सुरू झाले असल्याने मंदिरे का बंद आहेत?
- पूजा साहित्य विक्रेता
---------------
मंदिर बंद झाले त्यामुळे अभिषेक, पूजा नाहीत. ब्राह्मण म्हणून कुठे बोलावणे नाही, त्यामुळे वैयक्तिक पूजा (सत्यनारायण, देवी कवच, श्री सूक्त पठण, रुद्र) आदी सगळे बंद झाले. गेल्या वर्षी गणेशोत्सव, श्रावण, नवरात्र सगळे बंद झाले.
- ओमकार परुळकर, पुजारी.
---------------
गणेश मंदिराचा आनंद मोरे फोटो टाकेल
..........
वाचली