डोंबिवली : देशातील मंदिरे व तीर्थक्षेत्रे ही श्रद्धा, अस्मिता व धर्माशी निगडित तर आहेतच; परंतु याचबरोबर एक मोठी अर्थव्यवस्था याभोवती फिरत असते. ज्यांना सर्व काही आयते मिळाले, त्यांना हे कधी समजणार, असा टोला मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी राज्य सरकारला लगावला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमधील महाकालेश्वरच्या मंदिरात दर्शन घेतल्यावर त्यांनी गुरुवारी याबाबत ट्वीट केले.
पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी अनेक छोटे-मोठे व्यवसाय असतात. त्यावर तेथील हजारो कुटुंबांचे अर्थचक्र अवलंबून असते. त्यांची दीड वर्षात प्रचंड गैरसोय झाली आहे. मुळात त्यांना पैसा फार मिळत नसतो. त्यातच राज्यातील विविध घटकांना निधी, मदत मिळाली, पण मंदिरांवर अवलंबून असणाऱ्या वर्गाला काहीही मिळालेले नाही. सरकारने या घटकांचा विचार केलेला नाही. अन्य राज्यांत देव, धर्म यांना खूप महत्त्व दिले जात असले तरी, त्यासोबत जुळलेल्या अर्थचक्राचे महत्त्वही ते जाणतात. देवाला भक्तांपासून ‘न’ तोडणाऱ्या मध्य प्रदेश सरकारचे त्यांनी कौतुक केले. मध्य प्रदेशचा आणि महाराष्ट्राचा कोरोना वेगळा आहे का? हिंदू देवतांच्या दर्शनाने संसर्ग होऊ शकेल असा व्हेरियंट महाराष्ट्र सरकारला सापडला, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार घंटानाद आंदोलन करून या मुद्द्यावर सरकारला जाग आणण्याचा इशारा त्यांनी दिला.
-----------