उल्हासनगर : कामगार रुग्णालय समोरील रहिवासी वस्तीतील फटाक्याच्या गोदमातून शनिवारी मध्यरात्री फटाक्यांचा साठा ने-आण करण्यास स्थानिक नागरिकांनी विरोध केल्यावर, महापालिका अग्निशमन विभागाने फटाक्याने भरलेला टेम्पो ताब्यात घेतला. मात्र दोन दिवस उलटल्यानंतरही गुन्हा दाखल केला नसल्याने, विविध चर्चेला उधाण आले आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-३- कामगार रुग्णालय समोरील रहिवासी वस्तीत शनिवारी मध्यरात्री ३ वाजता आग लागल्याचा फोन स्थानिक नागरीकांकडून अग्निशमन विभागाला आला. अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांच्यासह पथक गाडी घेऊन घटनास्थळी पोहचले असता, संतप्त स्थानिक नागरिकांनी एका फटाक्याच्या टेम्पोला पकडून ठेवले होते. या विभागात फटाक्यांचे गोदाम असून रात्रभर फटाक्यांची ने-आन सुरू असल्याची माहिती नागरिकांनी बाळू नेटके यांना दिली. गोदामाला सील न करता, नेटके यांनी टेम्पो जप्त करून अग्निशमन विभाग कार्यालयात आणून ठेवला. फटाक्यानी भरलेला टेम्पो जप्त करून दोन दिवस उलटूनही, महापालिकेने काहीएक कारवाई केली नाही. यामध्ये मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानेच फटाके व्यापाऱ्यांना अभय दिल्याची टीका सर्व स्तरातून होत आहे.
महापालिका अग्निशमन विभागाने फटाक्याने भरलेला टेम्पो पकडूनही, संबंधितांवर गुन्हा दाखल का केला नाही?. असा प्रश्न अग्निशमन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांना केला असता, त्यांनी कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. तर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी फटाक्याच्या गोदामाला सील केले असून फटाक्याने भरलेला टेम्पो जप्त केल्याचे सांगितले. तसेच फटाके दुकानावर कारवाईचे संकेत दिले.
मध्यरात्री पर्यंत फटाक्याची दुकाने उघडी नेहरू चौकातील फटाक्याची दुकाने मध्यरात्री पर्यंत सुरू आहेत. असे चित्र असतांनाही महापालिका व पोलीस प्रशासन कारवाई का करीत नाही?. असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला. हे कमी म्हणून की काय, थेट रस्त्याच्या फुटपाथवर फटाके ठेवून त्याची विक्री केली जात आहे. नेहरू चौक परिसरात फटाक्याचे प्रसिद्ध मार्केट असून याठिकाणी कोट्यवधींची उलाढाल होते.